हाडाचा पत्रकार’ अन् मठ गावचा समाजसेवक हरपला!

के. जी. गावडे यांच्या कार्याला श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांकडून आदरांजली

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यात तब्बल ३३ वर्षे निष्कलंक आणि निर्भीड पत्रकारिता करताना कोणालाही न दुखावता सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे यांच्या निधनाने एक अभ्यासू पत्रकार, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आणि मठ गावच्या विकासासाठी सतत धडपडणारा समाजसेवक हरपल्याची भावना मठ येथे आयोजित श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांनी व्यक्त केली.

के. जी. गावडे यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच कला-सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांशी सलोख्याचे संबंध जपले. पत्रकारितेबरोबरच ‘मी आणि माझी वाडी’ एवढ्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मठ गावाच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. गावातील विविध विकासकामे जनतेच्या सोयी-सुविधांसाठी व्हावीत, यासाठी आमदार, पालकमंत्री तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची धडपड असायची. विशेष म्हणजे या कार्यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

संत लालाजी मंडळाच्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य उल्लेखनीय होते. दिवाळीचे औचित्य साधून मंडळाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात त्यांचा पुढाकार असे. आपल्या प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावामुळे त्यांनी समाजातील विविध घटकांना जोडून ठेवले.

‘एक उत्कृष्ट ज्येष्ठ पत्रकार’ म्हणून लौकिक मिळवतानाच मठ गावच्या सामाजिक आणि विकासात्मक कार्यातही त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मठ गावने एक समाजहितैषी व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशी भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्लेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, ॲड. एन. पी. मठकर, आरोलकर नर्सरीचे संचालक शिवराम आरोलकर, मठ विकास संस्थेचे चेअरमन सुभाष बोवलेकर, पत्रकार संघाचे सल्लागार प्रदीप सावंत, माजी पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, संत लालाजी मंडळाचे सचिन आईर, सामाजिक कार्यकर्ते दादा गावडे, प्रकाश गावडे, दत्ता कोकरे, बबन परब, उमेश नाईक, सुधाकर नाईक, देऊ परब, एकनाथ भगत, रामकृष्ण गावडे यांच्यासह मठ येथील ग्रामस्थ व के. जी. गावडे यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!