खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितिच्या वतीने

दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे

खारेपाटण तालुका झालाच पाहिजे मागणीसाठी विशाल निर्धार मेळावाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवेशद्वारावर असलेल्या व मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या व ब्रिटिशकालीन बाजारपेठ असलेल्या खारेपाटण या गावासह सह आजुबाजूच्या सुमारे ५० ते ६० या गावाची गेल्या ४५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या एकमुखी मागणी करीता रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी शेठ न. म. विद्यालय खारेपाटण येथे सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने “खारेपाटण तालुका झालाच पाहिजे. ! ” याकरिता विशाल निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी दिली.

खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने खारेपाटण तालुका व्हावा. या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्याची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन आज गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी स.१०.३० वा.करण्यात आले होते. यावेळी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष रामकांत राऊत, उपाध्यक्ष – मंगेश गुरव, सचिव – संतोष पाटणकर, समिती सदस्य तथा खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, पं.स सदस्य गुरुप्रसाद शिंदे, रुपेश सावंत, प्रशांत लाड, योगेश गोडवे आदी उपस्थित होते.

या निर्धार मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड व वैभववाडी या चार तालुक्यातील सुमारे १००० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने खारेपाटण तालुका झालाच पाहिजे या मागणीला पुन्हा एकदा बळ देण्यात येणार आहे.

ज्यावेळी रत्नागिरी हा सिंधुदुर्ग सह अखंड जिल्हा होता व सिंधुदुर्गातील त्यामध्ये ७ तालुक्याचा समावेश होता. त्यावेळी पासूनची ही ग्रामस्थांची जुनी मागणी असून त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे १ मी १९८१ मध्ये विभाजन करून नवीन सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. मात्र तालुका मागणीची चळवळ थांबली नाही खारेपाटण येथील ज्येष्ठ कार्यकर्ते कै. कांता आप्पा शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटण येथील दशक्रोषातील नागरिकांनी यशस्वी मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी तत्कालीन महसूलमंत्री शालिनीताई पाटील या दस्तुरखुद्द खारेपाटण मध्ये आल्या होत्या. त्यांनी खारेपाटण तालुका होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे व तसा शासन दरबारी पाठ पुरावा करणार असल्याचे येथील नागरिकांना सांगितले. मात्र एक रात्रीत खारेपाटण चे नाव डावलून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागणी नसतानाही वैभववाडी या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात आली. व खारेपाटण येथील ग्रामस्थांच्या तालुका मागणीला अक्षरश हरताळ पुसण्यात आला. व येथील दशक्रोशीतील नागरिकांना वंचित ठेवण्यात आले.

खारेपाटण तालुका झाल्यास दशक्रोशीतील नागरिकांना प्रशासकीय कामांना लागणार वेळ पैसा व श्रम वाचणार आहे. तसेच शासकीय कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. खारेपाटण हे आजुबाजूच्या सुमारे ५० ते ६० गावांचे केंद्र असून नेहमीचा बाजारहाट, दळणवळण शिक्षण व आरोग्य तसेच प्रशासकीय कामासाठी खारेपाटण हे ठिकाण येथील नागरिकांना जवळचे व सोयीचे वाटत आहे. त्यामुळे खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीने पुन्हा एकदा चळवळ अधिक गतिमान करून खारेपाटण तालुक्याची मागणी नेटाने करण्यात आली आहे.

याकरिता खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती सन २०१८ पासून कार्यरत झाली असून १९८२ पासूनची खारेपाटण तालुका करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आला आली आहे.याकरिता खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने खारेपाटण तालुका मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मंत्रालयास्तरावर महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

error: Content is protected !!