आंबेरी कर्ली खाडीत होडी उलटून दुर्घटना

दोघांना वाचवण्यात यश, पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृत्यू. आंबेरी वाक येथील घटना

चौके (प्रतिनिधी) : गणेशोत्सव निमित्ताने आंबेरी-वाकवाडी या आपल्या सासरवाडीला आलेले दर्शन चंद्रकांत टकारिया (रा. मुंबई, मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले. अखेर शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह सापडला. शेतीच्या कामासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत नदीपात्रा पलीकडे असलेल्या जुवा येथे होडीने (छोटी नौकेतून) प्रवास करत असताना होडी उलटून अपघात घडला. यावेळी होडी चालक स्वप्नील वाक्कर यांनी प्रसंगावधान राखत होडीतील श्वेता टकारिया व प्रणल वाक्कर यांना वाचवले. मात्र दर्शन टकारिया हे पाण्यात बुडून बेपत्ता झाले. दरम्यान काही तास सुरु असलेल्या शोध मोहिमेनंतर बेपत्ता दर्शन चंद्रकांत टकारिया यांचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर खाडी किनारी सापडून आला.

दरम्यान, याबाबत माहिती पोलीस, महसूल प्रशासनास देण्यात आली.ग्रामस्थ तसेच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहचली. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पोलीस, महसूल यंत्रणा, पोलीस पाटील तसेच स्कुबा डायविंग पथकाच्या माध्यमातून बेपत्ता दर्शन यांचा शोध सुरु होता.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शेतीच्या कामासाठी नदीपलीकडे जात असताना अचानक होडी नदीच्या पात्रात उलटल्याने चौघेजण पाण्यात पडले. होडीचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोघे सुखरूप बाहेर आले असले, तरी एक जण नदीच्या वेगात वाहून बेपत्ता झाले होते. गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आंबेरी-वाकवाडी परिसरात ही घटना घडली. नदीपलीकडे शेतातील कामासाठी हे कुटुंब होडीने प्रवास करत असताना अचानक संतुलन बिघडल्याने होडी नदीपात्रात उलटली. यावेळी होडीचालक स्वप्नील संदीप वाक्कर यांनी तत्परता दाखवत पाण्यात बुडणाऱ्या दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता दर्शन टकारिया यांचा शोध घेण्यासाठी स्कुबा डायव्हिंग पथकाची मदत घेतली जात असून नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली.अखेर दर्शन यांचा मृतदेह सापडून आला. कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!