धमकी देत तरुणीवर अत्याचार; संशयितावर बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात मागासवर्गीय तरुणीला तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जांभवडे येथील दशरथ आत्माराम बोलये (वय ४५) याच्याविरुद्ध वैभववाडी पोलिस ठाण्यात बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या आई-वडिलांसमवेत राहते. १५ सप्टेंबर रोजी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी दुपारी सुमारे १२ वाजता संशयित आरोपी घरी आला. त्याने तरुणीला जीवे मारण्याची तसेच तिच्या वडिलांना मारहाण करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता संशयित पुन्हा तिच्या घरी आला आणि त्याने पुन्हा अत्याचार केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घडलेली घटना आपल्या चुलत बहिणीला सांगितली. चुलत बहिणीने याबाबत तिच्या आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर पीडित तरुणीने वैभववाडी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

त्यानुसार वैभववाडी पोलिसांनी शनिवारी सकाळी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारादरम्यान उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे हलविण्यात आले.
या प्रकरणाचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.

error: Content is protected !!