जखमेतील किडे काढून रामचंद्र कुडव यांना दाखल केले संविता आश्रमात
डॉक्टर नसलेले पण अंतःकरणापासून डाँक्टरचे कार्य करणारे संदिप परब
खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजात आपण नेहमी डॉक्टर, नर्स, आया, वाँर्डबाँय यांना रुग्णांची सेवा शुश्रुषा करताना ,रुग्णांचे दुःख-वेदना दूर करण्यासाठी काम करताना पाहतो….परंतू आपल्या कोकण भुमित असा एक सामान्यांतला असामान्य माणूस आहे.जो डाँक्टर नसताना अंतःकरणा डाँक्टरची भुमिका पार पाडतो.रस्त्यावर वेदनेने विव्हळणा-या निराधार जखमी, आजारी माणसांची सेवा शुश्रुषा करून त्यांचे संस्थेच्या आश्रमांद्वारे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो. होय तेच ते जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व सचिव संदिप परब.
संदिप परब यांनी नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी संध्याकाळी वेंगुर्ले पिराचा दर्गा येथील बँक ऑफ इंडिया जवळ रामचंद्र कुडव हे गृहस्थ रस्त्यावर उजव्या पायाला झालेल्या जखमेमुळे निराधार अवस्थेत विव्हळत पडलेले दिसले. आजारी असलेल्या बांधवास पाहिल्यानंतर पुढिल दोन तासात त्या आजोबांच्या पायाला झालेली जखम जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांनी नेहमीप्रमाणे स्वतः साफ करून जखमेत झालेले हजारो किडे बाहेर काढले. पायाला व्यवस्थित ड्रेसिंग करून संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रम येथे आश्रयासाठी आणि औषध उपचारासाठी दाखल केले. या कामी संस्थेचे सेवा कर्मचारी महाबळेश्वर कामत , नरेश आंगणे, विजय नाईक यांनी त्यांना सहकार्य केले. याकामी त्यांना वेंगुर्ले ग्रामस्थांनी देखील मोलाचे सहकार्य केले. संदिप परब आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या तत्परतेमुळे एका निराधार आजोबांना संविता आश्रम चा आधार मिळाला.
हा सामान्यांतील सामान्य वाटणारा माणूस आपल्याला कधी रस्त्यावर एखाद्या जखमी बांधवांची शुश्रुषा करताना दिसेल,कधी आश्रमातील बांधवांसह रस्त्यांवर, स्मशानभूमित,जनतेच्या वरदळीच्या ठिकाणी शासकीय कार्यालयांजवळ स्वच्छता मोहिमेत व्यग्र असलेला दिसेल तर कधी सकाळी लवकर संस्थेच्या आश्रमातील स्टाफला आणणा-या गाडीचा स्वतः ड्राईव्हर झालेला दिसेल. असा हा माणूस म्हणजेच संदिप परब होय.
गेली २० वर्षांहून अधिक काळ संदिप परब या माणसाच्या अंतःकरणातील माणूसकीचा झरा सदैव फैसाळत वाहत आहे.या त्यांच्या झ-याच्या सानिध्यात आलेल्यांना मानवी जीवनाचा प्रेमळ आनंद ते देत आहेत.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या स्वातंत्रवीरांचे, क्रांतिविरांचे स्वप्न होते की या देशातील प्रत्येक माणसाला इथे माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे. सर्वांना सन्मानाने जगण्याची संधी इथे मिळावी. मात्र वास्तवात आज आपल्या या देशात २०११ च्या शासकीय जनगणना आकडेवारी नुसार सुमारे २० लाखाहून अधिक लोक मोठमोठाल्या मेट्रो शहरांत रस्त्यावरचे (प्रत्यक्षात ही संख्या खूप मोठी आहे) निराधार -वंचिततेचे जीवन जगत आहेत.जे मुलभूत अन्न-वस्त्र-निवारा ,शिक्षण आरोग्य यांपासून वंचित आहेत. या आपल्या देशबांधवांना माणूसकीचे जीवन मिळण्यासाठी संदिप परब आणि जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते त्यांच्यापरिने मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा राज्यात आश्रम , शेल्टर होम व पदपथावरील बालकांसाठीच्या डे केअर सेंटरद्वारे कार्यरत आहेत.व निराधरासाठी सदैव काम करीत आहे.















