एलसीबी सिंधुदुर्ग ची कारवाई
ओरोस (प्रतिनिधी) : शेअर्स खरेदी करून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ठेवीदारांची तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत नजरेआड असलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नसरापूर, पुणे येथून शिताफीने अटक केली. विवेक विजय पार्टे (वय ५३, रा. नसरापूर, बालाजी कलेक्शन, ता. भोर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७३/२०२४ अन्वये भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ तसेच MPID कायदा १९९९ चे कलम ३ व ४(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल झाला होता. या प्रकरणात फिर्यादी, साक्षीदार व ठेवीदारांची एकूण १ कोटी ४८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक १ विवेक विजय पार्टे आणि आरोपी क्रमांक २ वेदिका विवेक पार्टे हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. मागील दोन वर्षांपासून दोन्ही आरोपींचा शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता. त्यांच्या वास्तव्याबाबतही कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होत नव्हती.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. पथकाने आरोपीच्या पार्श्वभूमीची माहिती घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे सापळा रचून २४ सप्टेंबर २०२६ रोजी विवेक पार्टे याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग येथे हजर करण्यात आले आहे.
दरम्यान, विवेक पार्टे याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८/२०२४, भा.दं.वि. कलम ४०६ व ४२० अन्वयेही गुन्हा दाखल असून, या प्रकरणातही तो पाहिजे आरोपी आहे.मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन त्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे, हवालदार किरण देसाई, हवालदार अविनाश ओटवणेकर,महिला पोलीस हवालदार रुपाली खानोलकर यांच्या पथकाने केली.











