ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या संघटनात्मक विस्तारात उल्लेखनीय योगदान; विविध क्षेत्रांत कार्याची ठसा
आचरा (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग सहाव्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत राहून कोकण विभागातील संघटनात्मक बांधणी आणि विस्तारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत ही फेरनिवड करण्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकी जपत संतोष नाईक यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमधील पदाधिकारी व सदस्यांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवला आहे. संघटनेच्या विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी संघटनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने त्यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मश्री २०२६ परशुराम गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांची निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा विचार करून संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार संतोष नाईक यांची सलग सहाव्यांदा कोकण विभागीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
या फेरनिवडीबद्दल ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी, कोकण विभागातील पदाधिकारी व सदस्य, कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य, स्टार वृत्त, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी संतोष नाईक यांचे अभिनंदन केले आहे.












