‘राहुल गांधींचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उघड’

प्रमोद कामत यांचा आरोप; निवडणूक आयोगावरील टीकेवर भाजपचा पलटवार

ओरोस (प्रतिनिधी) : विशेष सखोल पुनरीक्षणासह (SIR) निवडणूक आयोगाने घेतलेले अंतिम निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या सहमतीने झाले असल्याचे आयोगाने स्पष्ट केल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेला ‘फेक नॅरेटिव्ह’ उघड झाला आहे, असा दावा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आज केला. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर निवडणूक आयोग योग्य आणि पराभव झाल्यानंतर त्याच आयोगावर आरोप करणे ही दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली.

सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबरला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या बैठकीनंतर SIRसह अंतिम निर्णय पूर्ण आयोगाच्या सहमतीने झाल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यापूर्वी आयोगातील दोन आयुक्तांनी काही प्रक्रियांबाबत नोंदविलेल्या आक्षेपांविषयी वृत्त प्रसिद्ध झाले होते. आयोगाने त्याबाबत मतभिन्नता ही निर्णयप्रक्रियेतील विचारविनिमयाचा भाग असल्याचे स्पष्टीकरण दिले.

कामत म्हणाले, ‘‘राहुल गांधी एकीकडे संविधानाचे पुस्तक हातात घेऊन बोलतात; मात्र दुसरीकडे संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांबद्दल सातत्याने अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जनतेचा संवैधानिक संस्थांवरील विश्वास कमी करण्याची ही रणनीती आहे. निवडणूक आयोगातील मतभेद म्हणून ज्या पत्राचा उल्लेख केला जात होता, ते धोरणात्मक निर्णयासंदर्भातील नसून प्रतिनियुक्तीवरील नियुक्तीच्या विषयाशी संबंधित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.’’

फॉर्म क्रमांक सहाबाबतही संभ्रम निर्माण केला जात असल्याचा दावा कामत यांनी केला. मतदार नोंदणी आणि SIR प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने काही प्रक्रियांमध्ये सुधारणा जाहीर केल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने आयोगाचे स्पष्टीकरण अपुरे असल्याचे सांगत SIR प्रक्रियेवरील आपले आक्षेप कायम ठेवले आहेत.

‘जिंकल्यावर आयोग चांगला कसा?’
कामत म्हणाले, ‘‘कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश किंवा अन्य राज्यांत विरोधी पक्षांना विजय मिळाला, तेव्हा हाच निवडणूक आयोग होता. मग भाजपचा विजय झाल्यानंतर आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न का उपस्थित केले जातात? पराभवाचे खापर प्रत्येकवेळी निवडणूक आयोगावर फोडण्यापेक्षा जनतेने दिलेला कौल स्वीकारून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.’’ ई.व्ही.एम नंतर आता मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून आयोगाला लक्ष्य केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. ‘‘जनतेचे प्रश्न घेऊन जनतेत गेल्यास प्रतिसाद मिळतो. ‘व्होटचोरी’चे आरोप करून जनतेने दिलेल्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही,’’ असे ते म्हणाले.

‘मतदार यादी शुद्धीकरणात सहभागी व्हा’
SIR ही मतदार याद्या अधिक अचूक करण्याची प्रक्रिया असल्याचे सांगत कामत म्हणाले, ‘‘शहरी भागात स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. काही नागरिकांची नावे मूळ गावासह शहरातही राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी उपलब्ध प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. आम्ही ज्या पद्धतीने बूथस्तरावर कार्यकर्त्यांची यंत्रणा उभी केली आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक पक्षाने काम करावे.’’

चौकट
‘‘संवैधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. संविधान आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवरील जनतेचा विश्वास अबाधित राहिला पाहिजे,’’ असेही कामत यांनी सांगितले.

error: Content is protected !!