हल्ल्यात मेस्त्री यांचा मुलगा जखमी
दया मेस्त्रीवर गुन्हा दाखल
कणकवली (प्रतिनिधी): घरात जेवण जेवत असताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर तुम्हाला संपवून टाकेन असे म्हणत मनसे माजी उपजिल्हाप्रमुख दयानंद अनंत मेस्त्री ( वय ५० ) याने पत्नीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मध्ये पडलेल्या मुलाच्या हातावर कोयता बसला. २२ मे रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. यात मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी दयानंद याची पत्नी शीतल हिने कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शीतल मेस्त्री यांनी तक्रारीत म्हटले की, काल २२ रोजी सायंकाळी जेवण करत असताना किरकोळ कारणावरून घरामध्ये दयानंद मेस्त्री यांनी वाद घालायला सुरुवात केली. दोन मुलगे आणि एक मुलगी एकत्रित जेवण करत होती. यावेळी दयानंद हे सर्वांना शिवीगाळ करत होते. तुम्हाला संपून टाकीन अशी ही धमकी देत होते. यावेळी पत्नी शीतल या घराबाहेर गेल्या असता दयानंद याने रागाने घरातील कोयता घेऊन कोयत्याने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगा ऋतुराज याने हाताने कोयता पकडला. यात ऋतुराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.












