जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या दालनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सहविचार सभा संपन्न

कर्मचारी-शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा; अजितकुमार देठे यांच्या वेतनाचा मुद्दा ऐरणीवर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्यांच्या सोडवणुकीसाठी संबंधित विभागप्रमुखांचे लक्ष वेधण्यात आले.

सभेमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध सेवा विषयक समस्या, प्रलंबित प्रकरणे, पदोन्नती, वेतनविषयक प्रश्न, अनुकंपा नियुक्ती तसेच आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्या प्रशासकीय स्तरावर तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सर्व शाळांना विनाविलंब गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच शाळांना पुरविण्यात येणाऱ्या धान्य व मसाल्यांची संबंधित विभागाकडून योग्य तपासणी करूनच त्यांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जून महिन्यात झालेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकांवर अन्याय झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षकांना न्याय देण्याची मागणी महासंघाने केली. याशिवाय अतिरिक्त बदल्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित प्रश्नांवरही चर्चा झाली.

फोंडा हायस्कूलमधील शिक्षक अजितकुमार विष्णू देठे यांच्या बंद करण्यात आलेल्या वेतनाचा प्रश्न या सभेत विशेषत्वाने उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. शिक्षण विभागाने यापूर्वी संबंधित संस्थेला या प्रकरणाबाबत सूचना दिल्या असून, संस्थेने विभागाच्या निर्णयाला सक्षम प्राधिकरणासमोर आव्हान दिले नसल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यामुळे अजितकुमार देठे यांना तातडीने सेवेत रुजू करून घेऊन त्यांचे वेतन पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

या सहविचार सभेला कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र राज्य महासचिव सुरेश तांबे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तथा समाजभूषण संदीप कदम, महिला व दिव्यांग विभागाच्या महाराष्ट्र राज्यप्रमुख जया पराडकर, सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव किशोर कदम, माध्यमिक शिक्षण शिक्षक संघटनेचे महासचिव अभिजीत जाधव, उपाध्यक्ष किशोर यादव, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रोहित पावरा, ज्ञानेश्वर सोनुने, आरोग्य विभागाचे संघटक गुरखे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे खातेप्रमुख आणि महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कर्मचारी व शिक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित प्रकरणांचा नियमानुसार निपटारा करण्यात यावा आणि संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रभावी कार्यवाही व्हावी, अशी भूमिका महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या सभेत मांडली. महासंघाचे सचिव किशोर कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!