श्रमदानातून चिंदर भटवाडी पोसेपाणी येथे कच्चा बंधारा…!

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

चिंदर भटवाडी येथील श्री भगवती उत्साही मंडळाचा पुढाकार; जलसंधारणासाठी ग्रामस्थांचे मोलाचे योगदान

आचरा (प्रतिनिधी) : पाणी अडवून जमिनीत पाणी जिरवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि पाण्याचे महत्त्व जनमानसात रुजवणे या उद्देशाने चिंदर भटवाडी येथील ‘पाणी अडवा, पाणी जिरवा श्री भगवती उत्साही मंडळा’ तर्फे रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी भटवाडी पोसेपाणी येथे श्रमदानातून कच्चा बंधारा बांधण्यात आला.

जलसंधारणाच्या या स्तुत्य उपक्रमासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी व्हावा, तसेच परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहू शकतात, याचे उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले.

या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष सुनील पवार, उपाध्यक्ष धनंजय नाटेकर, सचिव दिगंबर जाधव, खजिनदार विश्वनाथ उर्फ पिंट्या दळवी, सल्लागार संदीप परब, शशिकांत नाटेकर व प्रकाश वराडकर यांच्यासह संजय हडपी, दत्तात्रय जाधव, भरत वराडकर, समीर कांबळी, अनंत तोरसोळकर, तुषार पवार, गंधार कांबळी, उत्तम शेडगे, रवींद्र वराडकर, निखिल परब, राज परब, प्रकाश कांबळी, सदानंद परब, सत्यवान गावडे आणि प्रकाश गावडे यांनी सहभाग घेतला.

लोकसहभागातून जलसंधारणाचा संदेश !

पाणी ही मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशा श्रमदानाच्या उपक्रमांमुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होण्याबरोबरच सामाजिक एकोपा आणि सामूहिक कार्याची भावना अधिक दृढ होते. श्री भगवती उत्साही मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!