एल.सी.बी ने आवळल्या साईल च्या मुसक्या
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : एकतर्फी प्रेमातून दामिनी किरण पालव चा चाकूने भोसकून खून करणाऱ्या साईल धुरी याला सिंधुदुर्ग एल.सी.बी ने अवघ्या 5 तासांत पकडले असून साईल याने एकतर्फी प्रेमातून खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. वर्दे येथील कॉलेजवयीन युवती दामिनी चा चाकूने भोसकून खून केल्याची घटना 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली होती.त्यानंतर एसपी डॉ दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस तसेच एल.सी.बी पोलीसांची पथके खुनी मारेकऱ्याच्या मागावर होती. दामिनी हीचा खून केल्याच्या घटनास्थळापासून घाईगडबडीत रस्त्यावर येऊन काळ्या रंगाच्या स्प्लेनडर मोटरसायकलवरून काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या युवकाला कडावल च्या दिशेने जाताना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. या माहितीवरून तांत्रिक माहितीच्या आधाराने डिगस येथील दुकानाचे सीसीटीव्ही एल.सी.बी च्या पथकाने तपासले असता संशयित वर्णनाचा युवक आणि मोटरसायकल आढळून आली. मोटरसायकल च्या नंबर वरून हल्लेखोरांचा तपास घेत एलसीबी पोलिसांचे पथक वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात पोचले आणि मीठ धुरीवाडा येथील साईल विश्राम धुरी या दामीनीच्या खुनी हल्लेखोराला मध्यरात्री 12 वाजता ताब्यात घेऊन कुडाळ पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान प्राथमिक तपासात इन्स्टाग्राम वर मयत दामिनी आणि आरोपी साईल यांची मागील दोन वर्षांपासून ओळख असल्याचे समजते. दामीनीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या साईल याने मागील वर्षभरापूर्वी दामिनी ला प्रपोज केले होते मात्र दामिनी जे स्पष्ट नकार दिला होता. आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही याच रागातून साईल याने दामिनी चा चाकूने खून केल्याची माहिती मिळत आहे. खून करण्यासाठी वापरलेला चाकू, मोटरसायकल, आरोपीच्या अंगावरील रक्ताचे डाग असलेले घटनास्थळी घातलेले कपडे, मयत दामिनीचा मोबाईल, आरोपी साईल याचा मोबाईल आदी महत्वाच्या वस्तू जप्त करायच्या असून अधिक तपासात खुनाच्या आधीचा घटनाक्रम उलगडणार आहे. एसपी डॉ दहिकर अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, एपीआय पाटील पीएसआय हनुमंत भोसले, पी.एस.आय अनिल हाडळ, पी.एस.आय सावंत यांच्यासह एल.सी.बी च्या अंमलदार पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपीला पकडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.












