वैभववाडी (प्रतिनिधी) : कत्तलीसाठी राजरोसपणे गुरांची वाहतूक करणारा टेम्पो गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता नाधवडे येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गोवंश हत्या बंदी असताना कत्तलीसाठी अद्यापही गो वंशाची राजरोसपणे वाहतूक केली जात आहे. तालुक्यात यापूर्वी अशा वाहतुकीवर पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे. असे असूनही या कारवाईला न जुमानता राजापूर, खारेपाटण येथून गुरांची वाहतूक करण्याचे प्रकार उजेडात येत आहेत. ही गुरे निपाणी जिल्हा बेळगाव येथील कत्तलखान्यात नेली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही वाहतूक वैभववाडी मार्गे केली जात असल्याचे प्रकारही उजेडात आले आहेत.
सोमवारी सकाळी खारेपाटण येथून तरळे वैभववाडी मार्गे निपाणी कडे गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षक यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी नाधवडे येथे संबंधित टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अडविला. यावेळी टेम्पो चालकांनी गोरक्षकांच्या कारला धडक देऊन त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही गोरक्षकांनी गुरांची वाहतूक होत असलेला टेम्पो नाधवडे पाल्म बीच हॉटेल येथे अडवून पोलिसांना त्याची माहिती दिली.












