‘श्री औदुंबर स्वामी मंदिरातील खेळ पैठणीचा’ अंकिता सुभेदार मानकरी!

पूर्वा गुटे, प्राजक्ता बांदेकर यांनाही सुवर्ण बक्षिसे; कोजागिरीनिमित्त रंगला उत्साहाचा सोहळा…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील औदुंबर स्वामी मंदिराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाच्या अंकिता सुभेदार या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या, तर द्वितीय पूर्वा गुटे,तृतीय क्रमांकाच्या मानकरी प्राजक्ता बांदेकर ठरल्या.

कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून श्री औदुंबर स्वामी मंदिर उत्सव समितीच्या वतीने महिलांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मनोरंजक खेळ आणि स्पर्धांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या स्पर्धेत अंकिता आशिष सुभेदार यांनी मानाची पैठणी पटकावली. पूर्वा गुटे यांना एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तर प्राजक्ता बांदेकर यांना एक ग्रॅम सोन्याची नथ बक्षीस म्हणून देण्यात आली. मोबाईलवर सर्वाधिक स्टेटस पाहिल्याबद्दल स्नेहा सावंत या एक ग्रॅम सोन्याच्या हाराच्या मानकरी ठरल्या. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सविता गावडे आणि स्वप्नाली घाटे यांना सिल्क साड्या देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी येथील निवृत्त महिला अधिकारी स्नेहल तळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी राजा राणे, अदिती सावंत आणि पूजा धोत्रे, मनाली राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्नेहल तळेगावकर यांनी, ‘चूल आणि मूल’ या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना त्यातून काही काळ बाहेर पडून स्वतःसाठी आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे, कुटुंबापुरते मर्यादित राहिलेल्या महिलांना अशा उपक्रमांतून वेगळा आनंद आणि समाधान मिळते. श्री औदुंबर स्वामी मंदिर उत्सव समितीने आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, महिलांसाठी असे कार्यक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणप्रसंगी नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, अमोल टेंबकर, भुवन नाईक, आनंद काष्टे, हेमंत पांगम, सचिन मोरजकर, प्रशांत सावंत, ओम टेंबकर, राजा राणे, उद्योजक विराग मडकईकर, हर्ष जाधव, विनोद सावंत, रश्मी सावंत, आर्या टेंबकर, आराध्या मोरजकर, भारती नाईक, भगवान नाईक, हेमांगी माने, रंजना निर्मळ, रश्मी गोसावी, मनाली राऊत, अदिती सावंत, सुरेखा पवार, पूजा धोत्रे, नमिता गवस, स्नेहल तेरेगावकर आणि संजना गाटे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

error: Content is protected !!