तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा

नुकसानग्रस्त रापण नौकामालकास अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश

मालवण (प्रतिनिधी) : तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या पारंपरिक मासेमारी नौकेला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची मत्स्यव्यवसाय विभागाकडून तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. तसेच बाधित नौकामालकास शासकीय अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण केली. या दुर्घटनेत अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त मच्छीमारांना तातडीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या नौका ठेवण्याच्या शेडला शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत पारंपरिक रापण नौका (नोंदणी क्रमांक IND-MH-५-NM-२१३२) पूर्णपणे जळून खाक झाली. नौकेवरील अन्य मासेमारी साहित्य तसेच नौका ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले संपूर्ण शेडही आगीत जळून खाक झाले. नौकामालक गुंडू जानू कांदळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, शेडमध्ये असलेली दुसरी नौका उपस्थित मच्छीमारांच्या तत्परतेमुळे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी गणेश टेमकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जळालेल्या नौकेसह मासेमारी साहित्य व शेडच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. बाधित नौकामालकास शासनाच्या विविध योजनांमधून अर्थसाहाय्य मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांनीही संबंधित नौकामालकाशी संपर्क साधला व नुकसानीची पाहाणी केली. तसेच मत्स्यव्यवसाय विभागामार्फत नियमानुसार शक्य ती सर्व मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

रापण मासेमारी ही कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक सामूहिक मासेमारी पद्धत असून, या व्यवसायात सुमारे ५० ते १०० मच्छीमार सहभागी असतात. अनेक मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे नौका व मासेमारी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संबंधित मच्छीमारांच्या रोजगारावर तसेच आर्थिक परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांना मासेमारीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध व्हावी, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या ‘मासेमार साधनांवर अर्थसाहाय्य’ या योजनेंतर्गत बिगरयांत्रिक नौका बांधणीसाठी तसेच रापणकारांना प्रति सभासद ६० किलोच्या प्रमाणात अर्थसाहाय्य देण्याची तरतूद आहे. या दुर्घटनेतील बाधित मच्छीमारांना लागू असलेल्या शासकीय योजना व नियमांनुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या दुर्घटनेची दखल घेत संबंधित मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांना बाधित मच्छीमारांना तातडीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त मच्छीमारांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी पारंपरिक रापण मासेमारीसाठी आवश्यक नौका व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित मच्छीमारांना शासकीय अर्थसाहाय्य लवकरात लवकर मिळावे, यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!