भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या मागणीला यश !

शेतकरी पुरस्कारांच्या अर्जासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

आत्मा योजनेंतर्गत शेतकरी गट व वैयक्तिक शेतकऱ्यांना संधी; पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

आचरा (प्रतिनिधी) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी शेतकरी गट पुरस्कार आणि वैयक्तिक शेतकरी पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत आता २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मुदतवाढ मिळावी, यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेऊन ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना तसेच नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील शेती करणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे प्रगतिशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक व प्रयोगशील शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे.

यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२६ होती. त्यानंतर ती २६ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, शेतीकामातील व्यस्तता, प्रतिकूल परिस्थिती आणि आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या पाच शेतकरी गटांना, तसेच जिल्ह्यातील दहा वैयक्तिक शेतकऱ्यांना पुरस्कार आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी आणि गुणांकन निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी गटांनी तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे अर्जासाठी मुदतवाढ मिळाल्याने शेतकरी गट आणि वैयक्तिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी २० नोव्हेंबरपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, आत्मा प्रकल्प संचालक सौ.नाईकनवरे यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल भाजप किसान मोर्चाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!