बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने खारेपाटण येथे भव्य दीपावली बाजाराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील होतकरू महिला बचतगटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने दि.१ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खारेपाटण एस टी बस स्थानक येथे “भव्य बचतगट दीपावली महोत्सव २०२६ ” चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

दिवाळीच्या मुहूर्तावर दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं.५.०० वाजता या भव्य दीपावली बाजाराचे उद्घघाटन शिवसेना नेते तथा आमदार निलेशजी राणे यांच्या शुभ हस्ते होणार असून शासनाच्या महिलासक्षमीकरण उपक्रमाला हातभार लावत ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ मिळावी, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळावी आणि महिला बचतगटांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, हा या दीपावली बाजार महोत्सवा मागील प्रमुख हेतू असल्याचे सांगण्यात आले.

तसेच महिला उद्योजिकांनाही आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी त्यामुळे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.कणकवली तालुक्यातील सर्व महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन दीपावली बाजारामध्ये आपले स्टॉल लावावेत आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी केले आहे.

तर या दीपावली बाजारामध्ये दिवाळीचा फराळ, आकाशकंदील शोभेच्या वस्तू, दिवे, मेणबत्त्या, पणत्या, रांगोळी तसेच घरगुती वापरातील विविध दर्जेदार उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिवाळी खरेदीची उत्तम संधी यानिमित्त उपलब्ध होणार असून स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनीही मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच या दीपावली बाजार मध्ये स्टॉल नोंदणी व सहभागासाठी आस्था पाटणकर (CRP) — 9325327693, मंगेश गुरव, शिवसेना तालुकाप्रमुख, कणकवली 9422433760 / 9420918888, सुहास राऊत, शिवसेना शहरप्रमुख — 9595717121 यांचेशी संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!