‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकारच अस्तित्वात नाही; सायबर फसवणुकीपासून सावध राहा…!

सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांचे ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : ‘डिजिटल अरेस्ट’ हा अटक करण्याचा कोणताही अधिकृत प्रकार अस्तित्वात नाही. पोलीस किंवा सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरविणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे, हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे अशा फोनला घाबरून न जाता जागरूक राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरा पंचक्रोशीच्या वर्धापन दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, आचरा येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, फसवणुकीचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कातिवले म्हणाले, सायबर फसवणूक करणारे लोक पोलीस किंवा सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना फोन करतात. विविध गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचे फोन आल्यास घाबरून न जाता त्वरित फोन कट करावा आणि संबंधित क्रमांक ब्लॉक करावा. कोणालाही आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती किंवा ओटीपी देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या औचित्याने ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अशोक धोंडू कांबळी होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेश गावकर, मार्गदर्शक बाबाजी भिसळे, महिला आघाडी प्रमुख मनाली फाटक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव जे. एम. फर्नांडिस यांनी केले, तर आभार महिला आघाडी प्रमुख मनाली फाटक यांनी मानले. या कार्यक्रमाला संघाचे ७२ सभासद उपस्थित होते.

error: Content is protected !!