तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर आणि विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तळेरे एस.टी. स्टँडसमोरील छत्रपती शिवाजी महाराज रंगमंच, आदर्श रिक्षा संघटना येथे हे शिबिर होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. सुनील तळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली जाते. याशिवाय गेली २७ वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि साहित्यविषयक विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या उपक्रमांद्वारे सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले जात असून जिल्ह्यासह राज्यातील अनेक मान्यवरांनी या कार्याची दखल घेत कौतुक केले आहे.
यंदाच्या शिबिरात जिल्हा रक्तपेढी, सिंधुदुर्गनगरी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, कासार्डे यांच्या सहकार्याने रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबीन आणि एक्स-रे तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दोन्ही शिबिरांचे उद्घाटन सकाळी ९ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. रक्तदानासह आरोग्य तपासणीच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी तसेच नागरिकांनी सहभागी होऊन शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

सुनील तळेकर












