वैभववाडी तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करावी

प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सव्वाचार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.

वैभववाडी तालुक्यात परजिल्ह्यातील एका शिक्षकाने सव्वाचार वर्षांच्या आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
समाजाला दिशा देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांवर संस्कार करणाऱ्या पवित्र ‘शिक्षक’ पेशातील एका व्यक्तीकडून असे घृणास्पद कृत्य घडले असेल तर संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी आणि समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक बाब आहे. या प्रकरणाचे वास्तव सत्य लवकरात लवकर बाहेर येणे गरजेचे असून ते बाहेर न आल्यास समस्त शिक्षक वर्गावर त्याच्या चारित्र्यावर संशयाचे सावट निर्माण होणार आहे.सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आमची मागणी आहे की,या प्रकरणाची सखोल व निःपक्षपाती चौकशी करून

तपासाअंती सदर शिक्षक दोषी आढळल्यास त्याचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी शिक्षक समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे.

error: Content is protected !!