‘बिपरजॉय’ वळले पाकिस्तानकडे; कोकण किनारपट्टीचा धोका टळला

ब्यूरो न्युज (रत्नागिरी) : अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला. मात्र उधाणाच्या मोठ्या भरतीमुळे मिऱ्या, काळबादेवी, गणपतीपुळे आदी भागात समुद्राच्या मोठमोठ्या लाटा उसळल्या होत्या. किनारी भागात वाऱ्याचा वेगही वाढला होता.
किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने खबरदारी म्हणून याबात अलर्ट राहण्याचे आदेश सर्व विभागाला दिले होते. मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर अजस्र लाटा आदळत होत्या. काळबादेवी किनाऱ्यावरही पाणी भरले होते. गणपतीपुळे किनाऱ्यावर या भरतीचा प्रभाव जाणवला. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टी भागात वादळीवारे आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय समुद्रात १०५ ते १५० तर किनारपट्टीला ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. लाटांच्या उंचीतदेखील वाढ होणार असल्याने प्रशासनाकडून मच्छीमार, पर्यटक आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरूवारी दुपारी अचानक समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाली.
जिल्ह्यातील काही भागामध्ये ९ ते १० जूनला विजेचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ३०-४० किमी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वादळामुळे मोसमी पाऊस आता वेगाने पुढे सरकत आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. १० जूनला मान्सून कोकण किनारपट्टी भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!