सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिन बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ – उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरीता सातत्याने शासनाच्या विविध विभागामार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यास आलेला आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामगार ठेवणे हा फोजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महीने ते २ वर्षापर्यंत वाढविता येईल, इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान रुपये २० हजार व कमाल रुपये ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ वर्ष ते ३ वर्षापर्यंत वाढवता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
सर्व औद्योगिक संघटना असोशिएशन, व्यापारी असोशिएशन, क्रिडाई बांधकाम व्यवसायातील मालक असोशिएशन व वीटभट्टी असोशिएशन, सर्व शासकीय / निमशासकीय संस्था नागरीक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरीता जनजागृती करून या मोहिमेत सहभाग नोंदवावा व आपला जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.