कणकवली (प्रतिनिधी): जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर हे कोकणातील राजकीय, सामाजिक व्यासंगी पत्रकार.त्यांनी कोरोना काळात सिने-नाटक- मालिका आदी मनोरंजन क्षेत्रातील अतिशय लोकप्रिय कलावंतांशी बातचीत करून ‘सेलिब्रिटींचा कोरोना काळ’ हे वृत्तपत्रीय मालिका लेखन केले.माणूस कोणत्याही स्तरातील असो तो कोरोना काळात हतबल झाला नाही असं झालं नाही. तरीही त्याच्यातील संवेदनशीलता जागरूक राहून त्याने सकारात्मक दृष्टीने आपल्याबरोबर इतरांनाही संदेश देण्याचा सतत प्रयत्न केला, याचे प्रातिनिधिक चित्र म्हणजे ‘सेलिब्रिटींचा कोरोना काळ’ हे लेखन होय. हे लेखन आता पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे. जगातील कोणत्याही समूह दुःखात सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस या दोघांच्या वेदनेची नस सारखीच असते किंबहुना अशा काळात सेलिब्रिटीही अधिक सामान्य स्तरावर जगत असतात हेच या लेखनातून अधोरेखित होत आहे.जगविख्यात लेखक अर्नस्ट हेमिंग्वे हाही पत्रकारच होता.तो म्हणतो, दुःखाची नाळ जुळली की माणसाचा मतभेदाचा, लहान- थोरपणाचा स्तर मिटून जातो. कोरोना काळातील सेलिब्रिटींचे हे जगणे समजून घेताना समाजाच्या एका समपातळीवर हा कलाकार वर्ग कसा आलेला आहे याचे सूक्ष्म निरीक्षणही या लेखनातून मांडण्यात वायंगणकर यशस्वी झाले आहेत!
ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर लिखित सेलिब्रेटींचा कोरोना काळ पुस्तक वाचकांच्या भेटीला












