वैभववाडी बस स्थानकातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्राहक पंचायत मार्फत निवेदनाद्वारे मागणी

नवीन शैक्षणिक वर्षात वेळेनुसार शालेय बस व्यवस्था, वाहतूक नियंत्रक नियुक्ती, पिण्याचे पाणी, शौचालय याबाबत सुधारणा करण्याचे केले आवाहन

वैभववाडी (प्रतिनिधी): गुरुवार दि.१५ जुन २०२३ पासून २०२३/२४ चे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. वैभववाडी तालुक्यातील सर्वच गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वैभववाडी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. तरी नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी वेळेत शाळेत उपस्थित राहावेत या दृष्टीने एस.टी च्या फेऱ्यांचे योग्य ते नियोजन करून दि.१५ जुन पासून मानव विकास अंतर्गत असलेल्या सर्व एस.टी बस फेऱ्या सुरू कराव्यात. कालच बस स्थानक परिसराचे खडीकरण पूर्ण झाले आहे. त्याचे डांबरीकरण व्हावे. बस स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय व टाॅयलेटची सुविधा निर्माण करावी. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत एकच वाहतूक नियंत्रक असतो. त्यामुळे सकाळी ८ पूर्वी व सायंकाळी ५ नंतर येणाऱ्या व जाणा-या गाड्यांची माहिती मिळत नाही. प्रवासी ग्राहकांची गैरसोय होते. अजून एक वाहतूक नियंत्रक नियुक्त करावा. अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने मा.विभाग नियंत्रक, रा.प.सिंधुदुर्ग विभाग, कणकवली, जि.सिंधुदुर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ग्राहक पंचायत शाखा वैभववाडी तालुकाध्यक्ष तेजस साळुंखे, उपाध्यक्ष इंद्रजित परबते, सहसंघटक महिला संपती चौगुले, सचिव विवेक मालवणकर, कोषाध्यक्ष सचिन सावंत, सल्लागार एस.पी.परब.प्रशांत कुळये, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!