आदर्श सहकार पॅनेलला चार जागांवर मानावे लागले समाधान
शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल आणि विद्या सहकार परिवर्तन पॅनेल या सहकार पॅनलचा दारुण पराभव
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेलने एकतर्फी बाजी मारीत ११ जागांवर विजय मिळविला आहे. तर आदर्श सहकार पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल आणि विद्या सहकार परिवर्तन पॅनेल या सहकार पॅनलचा दारुण पराभव झाला असून एकही जागा मिळालेली नाही. पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकिसाठी गुरुवारी ९७.९७ टक्के एवढे चुरशीचे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ६२ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. आज सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील संस्थेच्या पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरू झाली. दुपारी दीड वाजता मतमोजणी संपली. ही निवडणुकी अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श सहकार पॅनेल, संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेल, दिनेश म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल, गजानन नानचे यांच्या नेतृत्वाखाली विद्या सहकार परिवर्तन पॅनेल अशा एकूण चार पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली गेली. या व्यतिरिक्त चार अपक्ष उमेदवार रिंगणात होते. यातील तालुका मतदार संघातील आठ पैकी पाच मंदार संघात सर्वसमावेशक तर तीन मतदारसंघात आदर्श पॅनेलने विजय मिळविला. तर जिल्हा मतदार संघातील सात पैकी सहा मतदारसंघावर सर्वसमावेशक पॅनलने तसेच एका मतदार संघावर आदर्श पॅनेलने विजय मिळविला.