कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते गावामध्ये हॉर्टसॅप अंतर्गत काजूपीक शेतीशाळा राबविण्यात आली. त्याअंतर्गत दिनांक 09/03/2026 रोजी नाटळ गावचे प्रगतशील शेतकरी नागेश रामचंद्र बोडेकर यांच्या काजू बागेत दारिस्ते गावातील शेतीशाळेतील शेतकऱ्यांना प्रक्षेत्र भेट घडविण्यात आली. यापुर्वी घेतलेल्या हॉर्टसॅप अंतर्गत काजू पिक शेतीशाळेच्या 8 वर्गांमध्ये शेतकऱ्यांना काजू लागवड कशी करावी, खोडकिडा नियंत्रण, जीवामृत, ताक अंडी संजीवक, अग्निअस्त्र, ब्रम्हास्त्र, दशपर्णी अर्क इत्यादी विषयी सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली होती. त्याचा धावता आढावा या प्रक्षेत्र दिनी घेणेत आला.
या शेतीशाळेमधील एका वर्गात कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ बाळकृष्ण गावडे यांनी काजू पिकावरील कीड रोगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले होते. आजच्या शेतीशाळेच्या शेवटच्या प्रक्षेत्र भेट कार्यक्रम नाटळ गावचे प्रगतशील शेतकरी नागेश रामचंद्र बोडेकर यांच्या काजू बागेत घेणेत आला. यावेळी अझोला लागवड, बंदिस्त शेळीपालन, कुकुटपालन, चारापिक लागवड, काजू पिकाच्या विविध जाती, छोटे शेततळे, ठिबक सिंचन संच, HDPE बेड मधील गांडुळ खत युनिट याची प्रत्यक्ष पहाणी करून सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना मंडळ कृषि अधिकारी, सांगवे श्रीम. झुलपे व उपकृषि अधिकारी, सांगवे श्रीम. ठाकूर यांच्या मदतीने श्री. बोडेकर यांनी दिली.
शेतीशाळेतील शेतकऱ्यांना मागील शेतीशाळेच्या वर्गांमध्ये जीवामृत, दशपर्णी अर्क, ब्रम्हास्त्र, अग्निअस्त्र, ताक अंडी संजीवक कसे तयार करावे, त्याचा वापर कसा करावा, त्याचे फायदे कोणते याबाबत सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आलेली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी ते बनवून आपल्या काजू बागेला त्याचा वापर करून त्यापासून त्यांचे काजू बागेचे उत्पादन वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच काजू पिकाचे खोड किड्याचे नियंत्रण कसे करावे याचेही प्रात्यक्षिक एका वर्गात दाखविण्यात आले होते.
या व अनेक बाबींची माहिती प्रात्यक्षिकासह शेतकर्यांना या संपूर्ण शेतीशाळेमध्ये देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडणेस मदत झाली. तसेच त्यांच्या उत्पन्न वाढण्यास मदत झाली. या प्रक्षेत्रदिनाला मंडळ कृषी अधिकारी सांगवे श्रीम. झुलपे आणि उप कृषी अधिकारी श्रीम. ठाकूर यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रक्षेत्र दिनाला मंडळ कृषी अधिकारी सांगवे श्रीम झुलपे, उप कृषी अधिकारी सांगवे श्रीम ठाकूर, सहाय्यक कृषी अधिकारी दारिस्ते श्रीम. सावंत, सहाय्यक कृषी अधिकारी दिगवळे श्रीम जाधव, सहायक कृषी अधिकारी नाटळ श्रीम. वर्णे, कृषी सखी सुनिता पवार व अंजली शिरसाट उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांपैकी सूर्यप्रकाश गावकर,सुरेश गावकर,दयानंद शिवडावकर, विनायक गुरव, नागेश बोडेकर, प्रमिला राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम सहाय्यक कृषी अधिकारी श्रीम जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व शेवटी श्रीम. सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानून प्रक्षेत्रदिन स्नेह भोजनाने संपन्न झाला.











