ब्युरो न्युज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं. त्या काळात ते गोळी घालून आत्महत्या करणार होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर यांच्या या धक्कादायक खुलाश्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रतिक्रिया उमटत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट दीपक केसरकर यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच केसरकर यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.
संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांना दीपक केसरकर यांच्या विधानाबाबत विचारले असता राऊत यांनी केसरकर यांच्या विधानाची खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे यांनी आत्महत्येबाबत केसरकरांशी चर्चा केली असेल. काही लोक सती जातात. मालक गेल्यावर सती जातात. तसे हे लोकही जाणार होते का? केसरकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. आत्महत्येची एवढी मोठी माहिती दडवली कशी? इतक्या मोठ्या महान नेत्याने आत्महत्या केली असती तर देशावर, राज्यावर आणि जगावर संकट कोसळलं असतं. त्यामुळे केसरकरांना अटक करा, अशी उपरोधिक टीका करत संजय राऊत यांनी मागणी केली.













