गुरांच्या गोठ्यावर झाड कोसळून लाखोंचे नुकसान

सुदैवाने गुरे बचावली ; दोन गुरे जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील डामरे गावात मान्सून च्या पहिल्या पावसात आंब्याचे झाड गुरांच्या गोठ्यावर कोसळून डामरे गावठणवाडी येथील संतोष बापू साटम यांचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मान्सून च्या पहिल्याच मुसळधार पावसात संतोष साटम यांच्या गोठ्यावर झाड पडले. गोठ्यात एकूण 18 गुरे बांधलेली होती.सुदैवाने गुरांना काही झाले नसले तरी दोन गुरे जखमी झाली आहेत. ही घटना 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. डामरे माजी सरपंच बबलू सावंत यांनी तात्काळ या नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदार आर जे पवार यांना दिली. तहसीलदार पवार यांनी मंडळ अधिकारी योजना पावसकर यांना याबाबत काळविल्यानंतर गाव कोतवाल दीपक कदम यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून माहिती घेतली.डामरे गावचे उपसरपंच सागर साटम, पोलीस पाटील विश्वास सावंत तसेच ग्रामस्थ एकनाथ गावकर, प्रदीप जाधव, संतोष पाटिल, सगर साटम, संतोष गावकर, आयुष सावंत, प्रकाश सावंत,सदानंद साटम, गोट्या जाधव, हेरंब राणे, योगेश सावंत, ओंकार राणे, प्रशांत सावंत, भास्कर सावंत यांच्या मदतीने गोठ्यावर पडलेले झाड हटविण्यात आले.दरम्यान महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

error: Content is protected !!