जीवन आनंद संस्था संचलित कार्व्हर डे नाईट शेल्टर कार्यकर्त्यांची कामगिरी

जोगेश्वरीतून हरवलेल्या स्मृतीभ्रंशग्रस्त वयोवृध्द उत्तमराव पाईकराव यांना अघ्या चार तासांत दिले कुटुंबियांच्या ताब्यात

आजोबांच्या कुटुंब शोधासाठी नगरसेवक बाळा नर यांनी केले मोलाचे सहाय्य

खारेपाटण (प्रतिनिधी): जीवन आनंद संस्था संचलित सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टर हे निवारागृह रस्त्यावरील निराधार-वंचित ,बेघर वयोवृध्द , मनोरूग्ण यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत आहे.या शेल्टरच्या इन्चार्ज संपदा सुर्वे यांच्या सतर्कतेमुळे काल जोगेश्वरीतून हरवलेल्या आणि स्मृतिभ्रंशाचा आजार असलेल्या ६० वर्षीय उत्तमराव पाईकराव या आजोबांच्या कुटुंबियांचा शोध घेवून त्यांना अवघ्या चार तासांत उत्तमराव यांची पत्नी पंचशिला उ.पाईकराव ,जावई लक्ष्मण व मेव्हणे हरी सटवाजी गाडगे यांच्या ताब्यात देण्यात आले. दि.२९ जुन,२०२३ च्या दुपारी जोगेश्वरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक अविनाश गिरी यांची सही असलेल्या पत्रानुसार उत्तमराव पाईकराव वय ६० वर्षे या स्मृतीभ्रंश झालेल्या वयोवृध्द आजोबांना जीवन आनंद संस्थेच्या सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टर या बेघर निवारागृहात दाखल करण्यात आले. हे निवारागृह बृह्नमुंबई महानगर पालिका अंमलात आणीत असलेल्या दीनदयाळ उपाध्याय नागरी बेघर निवारा योजनेअंतर्गत चालविण्यात येते. या निवारागृहाच्या इन्चार्ज संपदा सुर्वे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे व नगरसेवक बाळा नर यांच्या सहाय्यामुळे अवघ्या चार तासांत वयोवृध्द व्यक्तीला कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले.नगरसेवक बाळा नर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गटावर आजोबांची माहिती टाकल्यामुळे गोरेगाव आरे काँलनी येथील शाखाप्रमुख बाळा तावडे यांनी तात्काळ कुटुंबाशी संपर्क करून दिला. यामुळे अल्पावधीत कुटुंबियांपर्यत पोहचण्यात यश आले. जीवन आनंद संस्था संचलित कार्व्हर डे नाईट शेल्टर या निवारा गृहाची निर्मिती रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते व जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. सद्यस्थीतीत जीवन आनंद संस्था महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत आश्रम आणि शेल्टर होमद्वारे कार्यरत आहे.

error: Content is protected !!