जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यासाठी विविध संघटना व पालक वर्गाकडून मागणीला जोर
जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
वैभववाडी (प्रतिनिधी) : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून, वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या वेळेत जाणवणाऱ्या प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे तसेच ये-जा करणे त्रासदायक ठरत असून, त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. सकाळनंतर तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान वयातील विद्यार्थ्यांमध्ये थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी व उष्माघातासारख्या समस्या उद्भवण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीची वेळीच दखल घेऊन जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत तातडीने बदल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी विविध शिक्षक संघटना, सामाजिक संघटना तसेच पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने केवळ तापमानाची नोंद न करता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन या मागणीची दखल घेऊन शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.












