भजन, कव्वाली अन् शाहिरीतून उमटली समीर कदम यांची गानस्मृती; कलाकारांनी वाहिली सुरांची श्रद्धांजली

कलाकारांच्या सुख-दुःखात कलाकारांनीच उभे राहावे; अनिल तांबे यांचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : भजन, कव्वाली, गजल आणि शाहिरीच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे उदयोन्मुख युवा कलावंत, प्रसिद्ध भजनसम्राट व निष्ठावंत कार्यकर्ते स्मृतीशेष समीर रामा कदम यांच्या गानस्मृतींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलावंतांनी शब्द-स्वरांची भावपूर्ण आदरांजली वाहिली. ‘तुझे गीत गाण्यासाठी…!’ या सांगीतिक मैफिलीच्या माध्यमातून समीर कदम यांच्या अविस्मरणीय गीतांना उजाळा देत कलाकारांनी आपल्या सहकलावंताच्या स्मृतींना सुरांची मानवंदना अर्पण केली.

कलाप्रेमी मित्र मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिवंगत बुवा समीर कदम यांना गीतातून आदरांजली व श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या हस्ते बुवा समीर कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सिद्धार्थ तांबे, श्याम सावंत, संजय कदम आणि समीर कदम यांचे सुपुत्र स्वरांग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील गायक संदेश तांबे, सुदिन तांबे, राकेश मिठबावकर, वीरेश वळंजू आणि मनीष जाधव यांनी आपल्या सुमधुर गीतांमधून बुवा समीर कदम यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाला अध्यक्ष अनिल तांबे, उदय सर्पे, श्याम सावंत, सिद्धार्थ तांबे, संजय कदम, किशोर कदम, सचिन कोरलेकर, समीर कदम यांचे सुपुत्र स्वरांग, शेखर सर्पे, सुभाष कदम, महेश तळवणेकर, सुदिन तांबे, राकेश मिठबावकर, भाई हिवाळेकर, वीरेश वळंजू, संदेश तांबे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. गीत-संगीताच्या माध्यमातून बुवा समीर कदम यांना वाहिलेली ही आदरांजली उपस्थितांच्या मनाला भावून गेली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी समीर कदम यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कलाप्रवासातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. समीर यांच्याशी आपला सुमारे २५ वर्षांचा परिचय होता. भजन, कव्वाली, भीमशाहीरी आणि प्रबोधनाच्या चळवळीत सक्रिय असलेले समीर हे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या गायनातून केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजप्रबोधनाचा विचारही प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत होता, असे तांबे यांनी सांगितले.

संगीताला जात-धर्माच्या सीमा नसतात, तर माणसांना जोडण्याचे ते प्रभावी माध्यम आहे. ही ताकद समीर यांनी ओळखली होती. मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत त्यांच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद त्यांच्या कलेची व्यापक पोहोच दर्शवित होता, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी तांबे यांनी सिंधुदुर्गातील स्थानिक कलाकारांना अधिकाधिक प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज व्यक्त केली. कलाकारांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी जिल्ह्यातील कलाकारांनी एकत्र येऊन आकस्मिक निधीची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ किंवा संकेतस्थळ उभारावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समीर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित हा उपक्रम कलाकारांनी कलाकारांसाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगत त्यांनी समीर कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी सिद्धार्थ तांबे यांनी समीर कदम यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कलाप्रवासातील वेगळेपण अधोरेखित केले. आंबेडकरी समाजातून आलेल्या समीर यांनी भजनाच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देव-देवतांची भजने सादर करण्यासोबतच आंबेडकरी व बुद्धगीते, सवाल-जवाब आणि प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजघटकांना आपल्या कलेशी जोडले. त्यांच्या आवाजात एक वेगळी जादू होती. सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील विविध भागांतील रसिकांच्या मनावर त्यांनी आपल्या कलेची छाप उमटवली, असे तांबे यांनी सांगितले.

समीर यांचे अकाली निधन त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत दुःखद घटना असून, त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबीयांचा आणि लहान मुलांचा विचार करणे ही सर्व कलाकारांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. यापूर्वी वेंगुर्ल्यातील कलाकार ‘जगू’ यांच्या निधनानंतर सिंधुदुर्गातील कलाकारांनी एकत्र येत कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली होती. त्याचप्रमाणे कलाकारांनी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन गरजेच्या वेळी आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

समीर यांच्या कलेतील संवेदनशीलता आणि मनातील वेदना त्यांच्या गीतांमधूनही प्रकर्षाने जाणवत होती. “जग सेहरा नहीं, मैं खुद से हारा; जग से हारा नहीं है तेरा… जब जब मुझसे आस, जब जब मुझपे है तेरी; जब जब मुझपे उठा सवाल… जीना, जीना, जीना रे, उडा गुलाल…” या गीताच्या ओळींचा संदर्भ देत तांबे यांनी समीर यांच्या कलेतील भावविश्व अधोरेखित केले. त्यांच्या शब्दांना आणि सुरांना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहणे हीच त्यांच्या कलेला खरी मानवंदना असल्याचे सांगत त्यांनी समीर कदम यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले.

error: Content is protected !!