धामापूर कासारटाक्का महापुरुष देवस्थानला भाविकांची अलोट गर्दी

कोंबडा,बकऱ्याचा नवस फेडण्यासाठी भलीमोठी रांग

मालवण पोलीसांकडून वाहतूक, गर्दीवर नियंत्रण

चौके (अमोल गोसावी) : आज रविवार सुट्टीचा वार असल्याने धामापूर येथील श्री देव कासारटाक्का महापुरुष देवस्थानला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली दिसून आली. मालवण , कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील हजारो भावीक व पर्यटकांनी कासारटाक्का देवस्थानला हजेरी लावून नवस फेडण्याबरोबरच वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला.

मालवण तालुक्यातील धामापूर गावामध्ये मालवण – चौके – कुडाळ या मुख्य रस्त्यानजिक तसेच ऐतिहासिक धामापूर तलावाकाठी नवसाला पावणारे लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री देव कासारटाक्का महापुरुष देवस्थान स्थीत आहे. याठिकाणी बोललेला नवस शंभर टक्के पूर्ण होतोच अशी भाविकांची श्रद्धा आणि अनुभव आहे.

याठिकाणी बोललेला नवस फेडताना पाळणे बांधून , घंटा बांधून, दारू सिगारेट अर्पण करून तसेच , कोंबडा आणि बकरा मानवून तो कोंबडा अथवा बकरा त्याच परिसरात शिजवून लगेच नैवेद्य दाखवला जातो. आणि त्यानंतर तो प्रसाद भाविक स्वतः खातात. अशी प्रथा आहे. अशाप्रकारे दारू मटणाचा नैवेद्य असल्याने या देवस्थानला विशेष करून पावसाळ्यात बुधवार , शुक्रवार, रविवार या तीन वारांना भाविक तसेच पर्यटकांची मोठी गर्दी असते. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर दसऱ्यापपर्यंत याठिकाणी नवस फेडणे बंद असते.

दरम्यान यावर्षी पावसाळा उशीरा सुरू झाल्यामुळें आणि १७ जुलै पासून श्रावण सुरू होत असल्याने. भाविकांना सुट्टीचे वार म्हणजे रविवार हे खूप कमी मिळणार आहेत. श्रावण सुरू होण्यापुर्वी अजून एकच रविवार मिळणार असल्याने आज कासारटाक्का येथे नवस बोलण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली. बकरा कोंबडा मानवल्यानंतर जेवण शिजवण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी पावसापासून बचावासाठी आडोसा करून जागा अडवत स्वयंपाक करताना भाविक दिसून आले. कासारटाक्का परिसरात असलेले धबधबे आणि पावसाच्या पाण्यामुळे प्रवाहीत झालेला ओढा यामध्ये अनेकांनी डुंबण्याचा आनंद घेतला. पूर्वी याठिकाणी महिला येत नसत पण आज महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

सदर देवस्थान हे रस्त्याकडेला असून वळणावळणाचा रस्ता असल्याने शेकडो भाविकांची वाहने याठिकाणी रस्त्याकडेला उभी केलेली असतात. त्यामुळे ट्राफिक जाम ची समस्या निर्माण होते परंतु आज मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीसांनी दुपारच्या सत्रात वाहतूक सुरळीत ठेवण्यात आणि अतीउत्साही पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.

error: Content is protected !!