खारेपाटण (प्रतिनिधी) : शैक्षणिक प्रगतीत मानाचा तुरा रोवणाऱ्या खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नियोजित भव्य बहुद्देशीय सभागृहाचा भूमिपूजन सोहळा नुकताच रामेश्वरम मंदिर ट्रस्टचे सन्माननीय ट्रस्टी स्वामी राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते खारेपाटण येथे संपन्न झाला. यावेळी या वास्तूची पहिली वीट स्वामीच्या हस्ते रचून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात वेदोक्त मंत्रोच्चारात आणि धार्मिक विधींनी झाली. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जी लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त राजेंद्र वरुणकर, विजय देसाई, गुळेकर, कांबळे सर, सर्व विश्वस्त प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बहुद्देशीय सभागृहामुळे शाळेच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार असून विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या भविष्यातील प्रगतीची आणि विकासाची ही नांदी असे प्रतिपादन स्वामी राधाकृष्ण यांनी यावेळी व्यक्त केले. भूमिपूजन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वामी राधाकृष्ण पुढे म्हणाले की: ”शिक्षण ही समाजाच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे केवळ संस्थेचे नव्हे, तर समाजाचेही कर्तव्य आहे. हे सभागृह केवळ एक वास्तू नसून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ ठरेल.” या भूमिपूजन प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी आणि खारेपाटण परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी स्वामी राधाकृष्ण यांचे आभार मानले आणि हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. तर खारेपाटण परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, शाळेच्या या विस्तारामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.















