इंधन तुटवड्याने कणकवलीत गोंधळ; अनेक पेट्रोल पंप बंद, पर्यटकही त्रस्त
कणकवली (प्रतिनिधी) : शहरात सध्या पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील बस स्टॅन्ड, पोलीस ठाणे, वागदे येथील पेट्रोल पंप पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली. सीएनजी उपलब्ध झाल्याने रिक्षा आणि कार यांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. काल दुपारपासूनच काही पंपांवरचे पेट्रोल हे संपले होते आणि त्यामुळे अचानक उद्भवलेल्या या तुटवड्यामुळे पर्यटक देखील हैराण झाले आहेत. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जिथे पेट्रोल उपलब्ध आहे तिथे वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले. अनेक वाहनचालकांना इंधन न मिळाल्याने परत फिरावे लागत आहे, तर काहींना पर्यायी पंपांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, इंधन टंचाईमागे पुरवठा साखळीतील अडथळे कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.











