डाॅ.रुपेश पाटकर
परिचय :
डॉ. रूपेश पाटकर (MBBS, DPM) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेले एक सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत. डॉक्टरी पेशा सांभाळत त्यांनी विविध मानसिक, सामाजिक, पर्यावरणीय प्रश्नांवर काम केले आहे. एक परखड विचारांचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. गोव्यातील इन्स्टिट्यूट ऑफ सायकीयॅट्री अँड ह्युमन बिहेविअर येथे त्यांनी संशोधन अधिकारी म्हणून काम केले. मानवी तस्करीविरोधात कार्य करणाऱ्या ‘अन्यायरहित जिंदगी’ या संस्थेसोबत त्यांनी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून योगदान दिले आहे.
कुमारवयीन मुलांचे भावनिक आरोग्य, स्त्री व बालकांचे प्रश्न यावर ते सातत्याने मार्गदर्शन करतात. पर्यावरण संरक्षण व सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सामाजिक, मानसिक, पर्यावरणीय विषयांबाबत ते विविध वर्तमानपत्र, मासिके यांतून लेखन करत असतात. मानसिक विकार, पर्यावरण, कुमारवयीन मुलांशी संवाद, स्त्री व बालकांचे प्रश्न यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
डॉ. रुपेश पाटकर यांच्या या लेखांची मालिका ‘आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल’च्या माध्यमातून आम्ही प्रकाशित करत असून त्याला सुज्ञ वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल, हा विश्वास आहे.
____________________________________________________________________________________________________
मी लहान असतानाची गोष्ट. बाबांसोबत मी एका उत्सवाला गेलो होतो. तिथे एक संन्यासी आले होते. अनेक लोक त्यांच्या भोवती बसून ते जे काही सांगत होते, ते लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांचे भगवे वस्त्र, लांब दाढी, शांत चेहरा, धीरगंभीर आवाज या गोष्टींनी मला त्यांचे कुतूहल वाटले. तिथून परत निघताना माझ्या डोक्यात त्या संन्याश्याचाच विचार होता. परत येताना मी बाबांशी त्यांच्याविषयी बोललो.
बाबा म्हणाले, “जे लोक आपल्या जीवनाचं ध्येय परमेश्वरप्राप्ती हेच ठरवतात, ते संन्यास घेतात. पण संन्यास घेणं हे सोपं समजू नको हा. संन्यास म्हणजे फक्त भगव्या रंगाचे कपडे घालणे नव्हे. त्यासाठी मोठी साधना करावी लागते!” मी त्यादिवशी पहिल्यांदाच साधना शब्द ऐकला होता.
“बाबा, साधना म्हणजे काय हो?” मी विचारले.
माझ्या प्रश्नावर बाबा काही क्षण गप्प राहीले आणि नंतर म्हणाले, “रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य होते, स्वामी तुरीयानंद नावाचे. रामकृष्णांचे सर्व संन्यासी शिष्य बेलूर मठात रहात. तिथे मंदिरातील रोजच्या पुजेनंतर एक प्रकारचं मिष्टान्न नैवेद्य म्हणून दाखवलं जाई. आणि त्याचा प्रसाद दर दिवशी एका संन्याशाला दिला जाई. एक दिवस मठातला ब्रम्हचारी स्वामी तुरीयानंदांकडे प्रसाद घेऊन आला. त्यादिवशी प्रसाद घेण्याचा त्यांचा नंबर होता. पण स्वामीजींनी सर्व प्रसाद न उष्टावता, पळीने थोडासा प्रसाद आपल्या हातावर घेतला आणि तोंडात टाकून प्रसादाचा पेला ब्रम्हचार्याकडे परत केला. खरेतर सर्वच प्रसाद स्वामीजींनी संपवायचा होता. पण त्यांनी थोडासाच घेतला. त्यावर त्या ब्रम्हचार्याने विचारले, ‘आज चव चांगली नाहीए का?’ स्वामीजी उत्तरले, ‘चव उत्तम आहे म्हणूनच थोडासा घेऊन परत करतोय!’ स्वामीजींचं हे वर्तन म्हणजे साधना. त्यांच्या जागी तू असतास तर काय केले असतेस? चव चांगली लागली म्हणून भांडे चाटून पुसून दिले असते ना. संन्याशाने आपल्या मनाला संयम लावायचा असतो. मनाला संयम लावणे ही साधना! समजले का?”
मी ‘हो’ म्हणालो. पण बाबा त्यावेळेस काय सांगू पहात होते ते मला कळले नव्हते. कळले नसले तरी ‘आवडले म्हणूनच नाही खाल्ले’ ह्या स्वामी तुरीयानंदांच्या वृत्तीची आठवण मात्र मनात कायम राहिली. तिचा नेमका अर्थ काय हे मला खूप नंतर हळूहळू कळत गेले.











