विद्यामंदिर हायस्कूल येथील शिष्यवृत्तीमधील गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी डॉ. साळुंखे यांचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ध्येय निश्चित करावे. तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यामध्ये अव्वल स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकला तर तुम्ही यशस्वी व्हाल. यासाठी मेहनत करण्याची जिद्द ठेवा, असे आवाहन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी येथे केले.
कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे शिष्यवृत्ती मध्ये गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी डॉ. साळुंखे बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे सचिव विजय वळंजू, विश्वस्त अनिल डेगवेकर, मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही. बी. जाधव, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्मिता राणे, शिक्षक अच्युत वणवे, जनार्दन शेळके, विषयतज्ञ श्री. कापसे आदी उपस्थित होते.
श्री वळंजु म्हणाले, शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत मात्र तुम्ही देखील मेहनत घेणे आवश्यक आहे.
पालकांमधून मनोगत व्यक्त करताना चार्टर्ड अकाउंटंट अमोल खानोलकर यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. 180 मिनिटात दीडशे प्रश्न सोडवायचे असतात. यासाठी तुम्हाला वेळेचे नियोजन करणे, वाचन करणे अत्यावश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. डेगवेकर, श्री. कांबळे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी) मनस्वी पिळणकर -२४२ ( जिल्ह्यात ९वी ), राजवर्धन कापसे- २१८ ( जिल्ह्यात २६ वा ), मैत्रयी हिर्लेकर -२०४ (जिल्ह्यात ५१वी )
पूर्व उच्च प्राथमिक इंग्रजी विभाग (इयत्ता ५वी )स्वराली दीपक साळवे- ७०.६६%, तेजस सत्यवान सावंत -६९.३३%
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८वी) ध्रुव आनंद तेंडुलकर- २५६ (जिल्ह्यात दुसरा), कोमल रामचंद्र भानूसे -२३२ ( जिल्ह्यात ७वी ) ,अथर्व परशुराम कोचरेकर -२२६ (जिल्ह्यात ९वा ) , आदित्य अमोल खानोलकर -२२४ (जिल्ह्यात १०वा), सात्विक विठ्ठल मालंडकर -२१२ (जिल्ह्यात १७वा), आदित्य अच्युतराव वनवे -२०६ ( जिल्ह्यात २२वा) विधी विरेंद्र चिंदरकर -२०४ ( जिल्ह्यात २५वी), वेदांग मंदार दळवी -१९८ ( जिल्ह्यात ३४वा) ,देवश्री गुरुनाथ वालावलकर -१९८ (जिल्ह्यात ३५वी) यांचा सत्कार करण्यात आला.
वरील यशस्वी विद्यार्थ्यांना विद्या शिरसाट, सुनिता वारघडे, संदीप नागभीडकर, वैभवी हरमलकर, जनार्दन शेळके, नेहा सावंत, संगीता साटम आणि नेताजी जाधव या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुलांमधून ध्रुव तेंडुलकर आणि विधी चिंदरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जे. जे. शेळके यांनी केले. आभार अच्युत वणवे यांनी मानले.











