जानवलीचे पोलीस पाटील मोहन सावंत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

जानवली, तरंदळे आणि कणकवली शहरात पोलीस पाटील म्हणून बजावली सेवा; पत्नीसमवेत शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव

कणकवली (प्रतिनिधी) : जानवली गावचे पोलीस पाटील मोहन सावंत हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार सोहळा जानवली येथील मारुती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. श्री हनुमान प्रासादिक मंडळ, जानवली (वाकाडवाडी) यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मोहन सावंत यांनी पोलीस पाटील म्हणून काम करताना जानवली गावासह तरंदळे गावाचा पदभारही सांभाळला. तसेच गेल्या पाच वर्षांपासून कणकवली शहराचा पदभार सांभाळत त्यांनी काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना २०२५-२६ या वर्षाचा शासनाचा ‘कर्तव्यदक्ष पोलीस पाटील’ पुरस्कार पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

या सत्कार सोहळ्यात मोहन सावंत आणि त्यांच्या पत्नीला शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रंजन राणे, संदीप सावंत, पत्रकार नंदू सावंत, चंद्रकांत राणे, चंद्रशेखर राणे, ग्रामपंचायत सदस्य दामोदर सावंत, श्री. झगडे, वळंजू गुरुजी, आप्पा राणे, प्रशांत राणे यांच्यासह वाकाडवाडीतील ग्रामस्थ, महिला, जय हनुमान युवक कला-क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, हितचिंतक व मित्रपरिवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजन राणे यांनी केले. यावेळी बोलताना मोहन सावंत यांनी, पोलीस पाटील म्हणून काम करताना गावातील सर्व स्तरांतील नागरिकांचे सहकार्य लाभले. त्यामुळेच आपण ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो. सर्वांचे मनापासून आभार मानतो. सेवानिवृत्त झालो तरी जानवली गावासाठी सामाजिक कार्य करत राहीन, अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमातून मोहन सावंत यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.

error: Content is protected !!