त्रिंबक-चिंदर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश!

कुडाळ-देवगड एसटी बस आता देवगड आगारातून धावणार; १३ ऑक्टोबरपासून नवीन नियोजन

माजी सभापती अशोक बागवे, उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

त्रिंबक बागवेवाडी येथे एसटीचे ग्रामस्थांकडून स्वागत

आचरा (प्रतिनिधी) : गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ कुडाळ आगारातून देवगड आगाराच्या दिशेने धावणारी एसटी बस गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित झाली होती. यामुळे त्रिंबक, चिंदर तसेच परिसरातील विद्यार्थी, प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही एसटी बस नियमित सुरू व्हावी, यासाठी मालवण पंचायत समितीचे माजी सभापती अशोक बागवे, उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्यासह त्रिंबक व चिंदर येथील ग्रामस्थ सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, कणकवली विभाग नियंत्रक प्रदिप घोडे यांनी या बसचे संचालन कुडाळ आगाराऐवजी देवगड आगारातून करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑक्टोबरपासून हा बदल लागू करण्यात आला आहे.

देवगड आगारातून बसचे नवीन वेळापत्रक

नवीन नियोजनानुसार ही एसटी बस देवगड आगारातून सकाळी ७ वाजता सुटणार असून, सकाळी ८.३० वाजता आचरा येथून चिंदर, त्रिंबक मार्गे कणकवलीच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ नंतर कणकवली आगारातून बस आचरा व दुपारी २ वाजता आचरा येथून कुडाळच्या दिशेने कणकवलीमार्गे बस धावणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता बस कुडाळ आगारातून पुन्हा सुटून सायंकाळी ६.१५ वाजता कणकवली आणि ७.३० वाजता आचरा येथे पोहोचेल. त्यानंतर रात्री ९.३० वाजता देवगड येथे बस पोहोचणार आहे.

अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार

या एसटी बसच्या नियमित संचालनासाठी कणकवली विभाग नियंत्रक प्रदीप घोडे, देवगड आगार प्रमुख सौरभ औंधकर आणि कुडाळ आगार प्रमुख रोहित नाईक, आचरा वाहतूक नियंत्रण दिनेश साळकर यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत बसचे संचालन देवगड आगारातून करण्याचा निर्णय घेतल्याने त्रिंबक, चिंदर आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आज त्रिंबक बागवेवाडी येथे मालवण पंचायत समिती माजी सभापती अशोक बागवे, त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, त्रिंबक माजी उपसरपंच प्रमोद बागवे, शंकर बागवे, गजानन पाटणकर, श्रीकांत कानविंदे, शंकर पालकर, शमिका पालकर आदी ग्रामस्थांनी एसटी बसचे स्वागत केले.

दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, एसटी सेवा आता नियमित सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!