पदवीधर, शिक्षक व गोकुळ निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी घेतला तयारीचा आढावा

मतपत्रिका व मतदान साहित्याच्या सुरक्षित वाहतुकीसाठी कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समन्वय व आढावा बैठकीत निवडणूक तयारी, मतदान केंद्रांवरील सुविधा, मनुष्यबळ, साहित्य वितरण आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबर रोजी मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यापूर्वी सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी. गरजेनुसार अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी करावी. मतदानासाठी आवश्यक वाहन व्यवस्था करावी, तसेच मतपत्रिका हाताळणी करताना विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक बॅलेट पेपरवर होत असल्याने येणाऱ्या मतपत्रिका कडेकोट बंदोबस्तात मतदान केंद्रावर पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये नियुक्त नियुक्त अधिकाऱ्यांनी अलर्ट मोडवर काम करावे. मतदान केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी व मत देण्यासाठी येणारा मतदार याशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येवू नये. मतदारांची ओळख पटवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात यावी.
जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी २१२, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७० अशी एकूण २८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांसाठी ७७६ मतपेट्यांची आवश्यकता असून, सध्या ५२७ मतपेट्या उपलब्ध आहेत. उर्वरित मतपेट्या विभागीय आयुक्त, पुणे तसेच अन्य जिल्ह्यांकडून उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार ५६२ मतदार असून, त्यामध्ये ७६ हजार २८२ पुरुष, ३८ हजार २७२ महिला व आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. शिक्षक मतदारसंघासाठी १२ हजार २९९ मतदार असून, त्यामध्ये ७ हजार ९०१ पुरुष, ४ हजार ३९३ महिला व पाच तृतीयपंथी मतदार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी करवीर तालुक्यात सर्वाधिक ५७, तर शिक्षक मतदारसंघासाठी १२ मतदान केंद्रे आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात २४ भरारी पथके (FST), दोन व्हिडिओ व्ह्यूइंग पथके (VVT), दोन व्हिडिओ सर्व्हेलन्स पथके (VST) आणि राखीव पथकांसह आठ स्थिर सर्व्हेलन्स पथके (SST) कार्यरत राहणार आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच मतपत्रिका आणि मतदान साहित्याच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे येथे छपाई करून आणण्यात येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या १ लाख ४6 हजार आणि शिक्षक मतदारसंघाच्या १८ हजार मतपत्रिका जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा कोषागार कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात आणि तेथून संबंधित तालुक्यांमध्ये मतपत्रिका वितरित करतानाही सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या तसेच संवैधानिक व असंवैधानिक लखोटे तालुका मुख्यालयांवरून कसबा बावडा, रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामातील ‘ए’ गोदामात सुरक्षितपणे आणण्यात येतील. तेथून त्या पुणे येथे निश्चित केलेल्या ठिकाणी जमा करण्यासाठीही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मतदान साहित्याचे वितरण व संकलन करण्यासाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. करवीरसाठी बहुउद्देशीय हॉल, कसबा बावडा; गगनबावडा व शाहूवाडीसाठी तहसीलदार कार्यालयातील सभागृह; पन्हाळ्यासाठी नगरपरिषद हॉल, मयूरबाग; कागलसाठी बहुउद्देशीय हॉल; राधानगरी व भुदरगडसाठी संबंधित तहसील कार्यालये; आजऱ्यासाठी तहसीलदार कार्यालयातील प्रशासकीय इमारत; गडहिंग्लजसाठी पॅव्हेलियन हॉल, नगर परिषद गांधीनगर; चंदगडसाठी तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारत; शिरोळसाठी तहसीलदार कार्यालय आणि हातकणंगलेसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृह, तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत येथे व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील मतदान साहित्य जमा करण्यासाठी कसबा बावडा, रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामातील ‘ए’ गोदाम निश्चित करण्यात आले आहे.
बैठकीस पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण, गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी युसुफ शेख व प्रेमदास राठोड यांच्यासह विविध विभागांचे पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!