कसालमध्ये रंगणार साहित्य जागर!

१ नोव्हेंबरला पहिले ‘घुंगुरकाठी’ जिल्हास्तरीय साहित्य संमेलन; ५० साहित्यिकांचा सहभाग

डॉ. महेश केळुसकर संमेलनाध्यक्ष; श्रीनिवास नार्वेकर उद्घाटकपदी

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा जागर करण्यासाठी जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक आणि कलावंत प्रथमच ‘घुंगुरकाठी’च्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी (ता. १ नोव्हेंबर) पहिले ‘घुंगुरकाठी’ जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. विशेष म्हणजे संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, वक्ते, कवी ते निवेदकापर्यंत सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असणार आहेत. सुमारे ५० साहित्यिकांच्या सहभागातून दिवसभर सात सत्रांत साहित्याचा जागर होणार असल्याची माहिती ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर, तर उद्घाटकपदी ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर प्रमुख पाहुणे असतील. स्वागताध्यक्षपदी अवधूत मालणकर यांची निवड झाली आहे.एकत्रित व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने संमेलन आयोजित केले आहे. यासाठी जिल्ह्याबाहेरील साहित्यिकांना निमंत्रित न करता संपूर्ण संमेलन सिंधुदुर्गवासीयांचेच असावे, असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन खुले असून, जिल्ह्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.’’

मोबाईलचा वाढता वापर आणि घटत चाललेली वाचनसंस्कृती लक्षात घेऊन नव्या पिढीला साहित्याकडे वळविण्याच्या उद्देशाने जानेवारी २०२५ मध्ये ओरोस येथे ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाची स्थापना करण्यात आली. या व्यासपीठाच्या माध्यमातून आतापर्यंत सलग १९ मासिक साहित्यिक कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमांना साहित्यिक आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आता जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे लळीत यांनी सांगितले.

संमेलनाची सुरुवात लोककलेच्या आगळ्यावेगळ्या आविष्काराने होणार आहे. सकाळी दहा वाजता ग्रंथपूजनाने उद्घाटन होईल. त्यानंतर स्वागताध्यक्ष अवधूत मालणकर, प्रमुख पाहुणे प्रा. प्रवीण बांदेकर, उद्घाटक श्रीनिवास नार्वेकर आणि संमेलनाध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांची भाषणे होतील. दुसऱ्या सत्रात ‘मालवणी मुलखातील लोकसाहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा. डॉ. गोविंद काजरेकर अध्यक्षस्थानी असतील. यामध्ये लेखिका उषा परब लोककथा व दंतकथा, कवी अजय कांडर ओव्या, फुगडीगीते व लोकगीते, अभ्यासक जी. ए. सावंत उखाणे, कोडी व हुमाणी, तर सदाशिव गावकर (कुसबे) म्हणी व वाक्प्रचार या विषयांवर विचार मांडणार आहेत.

तिसऱ्या सत्रात लेखिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल. यामध्ये लेखिका वैशाली पंडित आणि कवी भाऊसाहेब गोसावी सहभागी होतील. दुपारच्या सत्रात दशावतारातील भीष्माचार्य यशवंतकाका तेंडोलकर यांची प्रकट मुलाखत विशेष आकर्षण ठरणार आहे. मालवणी बोलीचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि ‘मराठी आठव दिवस’ उपक्रमाचे संकल्पक पत्रकार रजनीश राणे ही मुलाखत घेणार आहेत. पाचव्या सत्रात ‘काव्यरंग’ हा मालवणी कवितांचा नाट्याविष्कार सादर होणार आहे. अभिनेते अभय खडपकर, निलेश पवार आणि सिद्धी वरवडेकर हे डॉ. सई लळीत यांच्या दोन मालवणी कविता अभिनयातून सादर करणार आहेत.सहाव्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन रंगणार असून, त्यामध्ये संध्या तांबे, रुजारिओ पिंटो, डॉ. सई लळीत, विठ्ठल कदम, सरिता पवार, निलेश गावकर आणि कल्पना मलये सहभागी होणार आहेत. सातव्या सत्रात खुले कविसंमेलन होईल. संमेलनस्थळी नोंदणी करणाऱ्या कवी-कवयित्रींना यात कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व अभिनेते निलेश पवार करणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल यांच्या सहकार्याने हे संमेलन होणार आहे.

जिल्ह्याच्या साहित्यवैभवाचा सन्मान
साहित्य संमेलन म्हटले की राज्यभरातील नामवंत साहित्यिकांची उपस्थिती, असा सर्वसाधारण अनुभव असतो. मात्र, ‘घुंगुरकाठी’ने याला वेगळे स्वरूप दिले आहे. सिंधुदुर्गातील साहित्यिकांनाच संपूर्ण व्यासपीठ देऊन स्थानिक साहित्यविश्वाची ताकद अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. मालवणी लोकसाहित्य, कथा, कविता, नाट्याविष्कार आणि दशावतार अशा विविध साहित्यिक व सांस्कृतिक आविष्कारांचा संगम या संमेलनात अनुभवता येणार आहे.

संमेलनाची सात आकर्षणे
१. लोककलेच्या आविष्कारासह ग्रंथपूजनाने उद्घाटन
२. ‘मालवणी मुलखातील लोकसाहित्य’ विषयावर परिसंवाद
३. नामवंत लेखकांचे कथाकथन
४. दशावतारातील ज्येष्ठ कलावंत यशवंतकाका तेंडोलकर यांची प्रकट मुलाखत
५. मालवणी कवितांचा ‘काव्यरंग’ नाट्याविष्कार
६. जिल्ह्यातील निमंत्रित कवींचे कविसंमेलन
७. नवोदितांसह सर्व कवींसाठी खुले कविसंमेलन

error: Content is protected !!