कवी, गायक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आजविलकर यांना महाराष्ट्र कला भूषण पुरस्कार जाहीर..

खारेपाटण (प्रतिनिधी) : इमेज इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ॲन्ड सोशल, बिझनेस सेरेमनी, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘भारत कर्तव्यम् गौरवगाथा कोल्हापूर २०२६’ या राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान पर्वात मुळगाव आजीवली ता.राजापूर येथील कवी, गायक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आजविलकर यांना ‘महाराष्ट्र कला भूषण पुरस्कार २०२६’ नुकताच जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचें सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

कला, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम साधणारे प्रकाश आजविलकर यांचा जीवनप्रवास संघर्षमय राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कवी आणि गायक म्हणून कलाक्षेत्रात योगदान देतानाच सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजभान आणि माणुसकीची मूल्ये जपली आहेत. त्यांचा संघर्षमय प्रवास आणि सामाजिक बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र कला भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या पुरस्काराचा वितरण सोहळा रविवार दि.१८ऑक्टोबर २०२६ रोजी, दुपारी १.०० वाजता कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्मारक नाट्यगृह, दसरा चौक येथे होणार आहे. तर सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार कवी गायक प्रकाश आजविलकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

error: Content is protected !!