सिंधुदुर्गात रुजतेय ‘म्युल’चे जाळे!

सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात स्थानिक बँक खातेधारक; सहा गुन्हे दाखल, परराज्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे

कमिशनच्या आमिषाने बँक खात्यांचा गैरवापर; पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचा सावधगिरीचा इशारा

ओरोस (प्रतिनिधी) : सायबर गुन्हेगारांचे जाळे आता सिंधुदुर्गातील सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यांपर्यंत पोहोचू लागले आहे. थोड्याशा कमिशनच्या आमिषाने स्वतःचे बँक खाते दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचे आणि त्यातून सायबर फसवणुकीचे लाखो रुपये फिरवायचे, असा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात उघडकीस येत आहे. सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल बँक अकाउंट’चे बीज सिंधुदुर्गातही रुजू लागल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचे आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये स्थानिकांसह परराज्यांतील संशयितांचाही सहभाग समोर आला आहे.

विशेष म्हणजे, सायबर फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी स्वतःचे खाते उपलब्ध करून देणारे नागरिकही गुन्हेगारी कारवाईच्या कचाट्यात सापडत आहेत. त्यामुळे सहज मिळणाऱ्या पैशांच्या मोहात पडून बँक खाते दुसऱ्याला वापरायला देऊ नका, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, मालवण, सिंधुदुर्गनगरी, देवगड आणि दोडामार्ग या सहा पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक अशा सहा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यांच्या तपासात सिंधुदुर्गातील स्थानिक नागरिकांसह पश्चिम बंगाल, गुजरात तसेच अन्य राज्यांपर्यंत धागेदोरे पोहोचले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यातील आठ, पश्चिम बंगालमधील दोन आणि गुजरातमधील एक अशा संशयितांवर अटकेची कारवाई झाली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. काही अन्य संशयितांच्या सहभागाबाबतही पोलिस तपास सुरू आहे.

error: Content is protected !!