७ महिन्यांपुर्वी जि.मथुरा (उत्तरप्रदेश) येथील वृंदावन देवस्थान येथून हरवला होता पुरूषोत्तम.
खारेपाटण (प्रतिनिधी): जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रममधील कार्यकर्त्यांनी नुकतेच पुरूषोत्तम सराठे वय वर्षेः४५ या मनोरूग्ण व्यक्तीच्या कुटुंबियांचा गुगल द्वारे शोध घेवून त्यास ताब्यात दिले. उत्तरप्रदेशातील वृंदावन देवस्थान जि.मथुरा येथे दि.६ नोव्हेंबर,२२ रोजी आजी आजोबांसह गेला असताना तेथून हरवलेला पुरूषोत्तम मानसिक रूग्णावस्थेत ७ महिन्यांनी पोहचला तो थेट विरार रेल्वे स्टेशनवर. रस्त्यावरचे निराधार वंचित जीवन जगत असलेल्या वयोवृध्द, मनोरूग्ण, जख्मी,आजारी बांधवांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संदिप परब यांनी मुंबईतील सांताक्रुज, दहिसर सह विरारफाटा ता.वसई (जि.पालघर ) ,पणदूर-किन्लोस-अणाव ता.कुडाळ (सिंधुदुर्ग) व गोवा राज्यात संस्थेचे आश्रम , शेल्टर होम व डे केअर सेंटर सुरू आहेत. जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांना विरार रेल्वे स्टेशनवर पुरूषोत्तम सराठे निराधार वंचित अवस्थेत आढळून आला.तेव्हा त्यांनी त्याची विचारपूस करून त्यास वसई रेल्वे पोलिस स्टेशनच्या पत्राद्वारे प्रथम सांताक्रुज (मुंबई) येथील कार्व्हर डे नाईट शेल्टर येथे व नंतर विरारफाटा येथील समर्थ आश्रमात दाखल करून पुरूषोत्तम च्या कुटुंबियांचा गुगलद्वारे शोध घेत असताना मध्यप्रदेश मधील रायसेन जिल्ह्यातील विदिशा मतदार संघाचे आमदार शंशाक भार्गव यांनी रायसेन जिल्हा नियंत्रण कक्षाचा नंबर तात्काळ देवून मोलाचे सहाय्य केले. नियंत्रण कक्षातून रायसेन पोलिस स्टेशनचा संपर्क नंबर मिळाला. रायसेन पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मनोजसिंग यांनी मनोरूग्ण पुरूषोत्तमच्या कुटुंबातून त्याचे भाचे रोहित सेन यांना तात्काळ बोलावून घेतले. तब्बल ७ महिने कुटुंबियांपासून दुरावलेल्या आणि रस्त्यावर हालअपेष्टांचे निराधार वंचित जिवन जगलेल्या पुरूषोत्तमचा व्हिडिओ काँलवरून आईशी संवाद होत असताना त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. पुरूषोत्तमच्या पुनर्मिलन प्रक्रीयेत वसई रेल्वे पोलिस स्टेशनच्या ठाणे अंमलदार श्रद्धा नाईक यांचेसह विरार रेल्वे पोलिस चौकीतील पोलिस अधिकारी महादेव मौले व सकपाळ यांचे सहाय्य झाले.नुकतेच समर्थ आश्रमात पुरूषोत्तमचे औक्षण करून त्यास त्याचे भाचे रोहित सेन यांचे हवाली करण्यात आले.यावेळी आश्रमचे कार्यकर्ते भाईदास माळी, दिपक अडसुळे,चंदा क्षेत्री यांची उपस्थीती होती.











