खारेपाटण (प्रतिनिधी): कोकणात गेले ४/५ दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तसेच वादळ वाऱ्याने खारेपाटण कपिलेश्वरवाडी येथील रहिवासी श्री मंगेश उर्फ आण्णा बंडू तेली यांच्या घराच्या शेडवर बुधवारी रात्री ८.०० वाजताच्या सुमारास जुनाठ मोठे पिंपळाचे झाड कोसळल्याने शेडचे मोठे नुकसान झाले.तर शेडच्या खाली उभी असलेली श्री दैवत अंकुश तेली यांच्या मालकीची चारचाकी तवेरा गाडी क्र.एम एस ०४ एफ एफ ०३२४ या गाडीवर देखील पिंपळाची फांदी कोसळल्याने गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच सौ प्राची. इसवलकर,उपसरपंच श्री महेंद्र गुरव,ग्रा.प सदस्य जयदीप देसाई,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, ग्रामविकास अधिकारी श्री.जी. सी. वेंगुर्लेकर,तलाठी के.सिंगनाथ, वीज अभियंता श्री मर्ढेकर यांनी तातडीने घटना स्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.
ही घटना बुधवारी रात्री ८.०० वाजताच्या सुमारास घडली.यावेळी वीज वाहिनीच्या तारा देखील तूटल्यामुळे वीजपुरवठा बंद झाला आहे.तर मुंबई – गोवा महामार्गावरून – श्री देव कालभैरव मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.तर श्री आण्णा तेली यांच्या घराच्या शेडवर पिंपळाचे झाड कोसळल्याने त्यांच्या शेडचे सुमारे १ लाख ५०,००० /- रुपये रकमेचे नुकसान झाले आहे.तर. याच शेडखाली उभी असलेली दैवत अंकुश शेट्ये यांची गाडीच्या ड्रायव्हर साइटच्या मागच्या भागावर पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळल्याने गाडीचा भाग चेंबला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये गाडीचे सुमारे ७०,०००/- रुपये रकमेचे नुकसान झाले आहे.
दरम्यान अपघात घडल्या वेळी श्री. रवींद्र केंगाळे,ग्रा.प.सदस्य जयदीप देसाई,विजय देसाई,बबन तेली यांनी पिंपळाचे झाड कोसळताच धाव घेऊन झाड बाजूला करून मुंबई – गोवा ते कालभैरव मंदिर कडे जाणारा बन झालेला रस्ता तातडीने मोकळा केला.
शासनाच्या वतीने जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर यांनी केले आहे.












