महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणगाथेत गुरुनाथ ताम्हणकर यांच्या शैक्षणिक प्रयोगांना अग्रस्थान

मसुरे (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे शिक्षणगाथा या त्रैमासिकाची निर्मिती केली जाते. या त्रैमासिकात शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण संचालकांच्या संपादनातून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी राज्यातील प्रयोगक्षम शिक्षकांचे शैक्षणिक प्रयोग शाळा-शाळांमध्ये जाऊन पोहोचावेत म्हणून शैक्षणिक लेख प्रकाशित केले जातात.
जुलैच्या त्रैमासिकात मसुरे देऊळवाडा या शाळेतील शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘इथे गणिताच्या भीतीची बजाबाकी होते.‌‌… आणि आवडीचा होतो गुणाकार” या लेखाला अग्रस्थान देण्यात आले आहे. या लेखांमध्ये त्यांनी राबवलेल्या गणित विषयातील उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. हे प्रयोग त्यांनी वेरली, मसुरे नं.१ या शाळेमध्ये राबविले आहेत. त्यांच्या या लेखाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या लेखासोबतच या त्रैमासिकात शिक्षणाचे जागतिक आयाम, अध्ययन अक्षमतांचा वेध, गडचिरोलीतील शिक्षणाचा फुलोरा, आरोग्य शिक्षणाची नवी दिशा, जगाला जोडणारी शाळा, विद्यार्थी घडविताना, चला वाचूया – स्वतःला घडवूया इत्यादी वाचनीय व मार्गदर्शक लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
“एज्युकेशन वर्ल्ड फोरम” या महत्त्वपूर्ण शिक्षण परिषदेतील ठळक बाबींची माहितीही आपल्या विशेष लेखात मान. श्री. सुरज मांढरे, शालेय शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी या त्रैमासिकामध्ये दिली आहे. या त्रैमासिकाचे संपादक कृष्णकुमार पाटील संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे हे असून कार्यकारी संपादक श्री. किरण केंद्रे बालभारती पुणे यांनी लेखन केले आहे.

error: Content is protected !!