सरकारी वकील रुपेश देसाईंच्या यशस्वी युक्तिवादामुळे आरोपीचा जेलमुक्काम वाढला
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पोक्सोसह बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी मिलिंद मालोजी पुजारे ( रा पुरळ ता देवगड ,सिंधुदुर्ग ) याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेल्या यशस्वी युक्तिवादामुळे आरोपी मिलिंद पुजारे चा जेलमुक्काम वाढला आहे. आरोपी मिलिंद पुजारे याने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशि शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. ही घटना 12 जानेवारी 2023 ते 27 एप्रिल 2023 च्या दरम्यान घडली होती. पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मिलिंद पुजारे वर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा 6 मे 2023 रोजी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. आरोपीने दुसऱ्यांदा केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेताना सरकारी वकील देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. गुन्ह्यातील साक्षीदार आणि आरोपी एकाच ठिकाणचे असून आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. पीडितेचा गर्भपात झालेला असून पीडिता, आरोपी आणि अर्भकाचे डी एन ए कोल्हापूर येथील वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आरोपीला जामीन मिळाल्यास त्याच्यापासून पीडिता आणि तिच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका पोचू शकतो.सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी आरोपी मिलिंद पुजारे चा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला.












