कुडाळ(अमोल गोसावी) : कुडाळ आगारातून ग्रामीण भागात सुटणाऱ्या फेऱ्या मागील काही महिने बंद तर उशिरा सुटत आहेत. यामुळे ग्रामीण भागातून कुडाळ येथे येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कुडाळ आगारातून कुसगाव येथे जाणाऱ्या फेऱ्या बंद आहेत. यात प्रामुख्याने कुडाळ आवळेगाव मार्गे कुसगाव ही संध्याकाळी ५.३० वाजता सुटणारी फेरी तसेच कुडाळ वेताळ बांबर्डेमार्गे कुसगाव ही रात्री ७ वाजता सुटणारी फेरी पूर्णतः बंद असून विद्यार्थी वर्ग तसेच कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत या दोन्ही फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी भाजप युवानेते आनंद शिरवलकर यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत आगार व्यवस्थापक पाटील यांनी वरील फेऱ्या सुरू करण्यात येतील. यासाठी सदर ग्रामपंचायतीकडून लेखी निवेदन देण्यात यावे. त्यानंतर या फेऱ्या सुरू करण्यात येतील, असे सांगितले.
कुडाळ – कुसगाव एसटी फेऱ्या सुरू करा !












