कणकवली (प्रतिनिधी) : भजन प्रेमी व कला संघ कणकवली यांच्यावतीने शनिवारी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ९ निमंत्रित नवोदित भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. यात श्री काशीकलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कलमठने प्रथम क्रमांक पटकावून ७ हजार ७७७ रु. व आकर्षक चषकाचे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे श्री नटराज प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळीने द्वितीय क्रमांक पटकावून ५ हजार ५५५ रु. व आकर्षक चषक तर श्री स्वरसंगम प्रासादिक भजन मंडळ कासरलने तृतीय क्रमांक पटकावून ३ हजार ३३३रु. व आकर्षक चषकाचे मानकरी ठरले.
भजन स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना व वैयक्तिक स्वरुपात बक्षीसे प्राप्त केलेल्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कारागृह तुरुंगाधिकारी रविंद्र टोणगे, भजनी बुवा प्रकाश पारकर,जेष्ठ पत्रकार गणेश जेठे, गोपी लाड, रवींद्र मेस्त्री, गणेश पारकर, सुदर्शन फोपे व इतर भजन प्रेमी उपस्थित होते. यावेळी रवींद्र टोणगे म्हणाले की, जीवनामध्ये संयम महत्त्वाचा आहे. संयम असला की गुन्हे घडत नाहीत. एखादे उद्दिष्ट साध्य करताना अपयश हे येतच असते म्हणून खचून जायचे नाही तिथेच थांबून पुन्हा पुढे जायचा प्रयत्न करायचा. अशा भजन स्पर्धांमुळे लोकांमध्ये सलोख्याची भावना आणि समाजामध्ये शांती निर्माण होण्यास मदत होते. बुवा प्रकाश पारकर म्हणाले की, या भजन स्पर्धांमुळे अनेक नवोदित बुवा ना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. भजनी बुवा व कलाकारांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करू, असे सांगितले. तसेच यावेळी गणेश जेठे व गोपीनाथ लाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार उमेश परब यांनी मानले. दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेले या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातील अनेक भजनी बुवांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन आयोजकांना व नव्या भजनी बुवांना प्रोत्साहन दिले. रात्री उशिरापर्यंत या स्पर्धेला रसिकांची प्रचंड गर्दी लाभली.
या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ करंजे संघाने उत्तेजनार्थ (१ हजार १११ रु. व आकर्षक चषक) पारितोषिक पटकाविले. उत्कृष्ट गायक चेतन गुरव (श्री काशीकलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कलमठ), उत्कृष्ट पखवाज वादक मयुर मेस्त्री (सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ, जानवली), उत्कृष्ट तबला वादक प्रेम मेस्त्री (श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ, करंजे), उत्कृष्ट झांजवादक नागेश शिरसाट (श्री पिंपळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नागवे), उत्कृष्ट कोरस श्री साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ निरवडे, उत्कृष्ट अभंगाचे सादरीकरण श्री नटराज प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, उत्कृष्ट गजर सादरीकरण श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ करंजे यांनी वैयक्तिक स्वरुपातील पारितोषिके पटकाविली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून विनोद गोखले व मारुती मेस्त्री यांनी काम पाहिले.













