कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित आहे. गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या दारूबाबत संबंधित विभागासह पोलिसांनी ठोस पावले उचलली नाही तर या दारूच्या विरोधात जिल्हा शिवसेना महिलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क मोठया प्रमाणात धाडी टाकून दारू जप्त करते त्या दारूचे पुढे काय? की संगनमताने टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई केल्याचे भासाविण्यात येते?महसूल विभाग जसा अवैध वाळू धंद्यांविरोधात कारवाई करतात त्याच्या पाव टक्का कारवाई जरी दारुधंद्याविरोधात केली तरी मोठ्या प्रमाणात याला आळा बसेल. त्याचप्रमाणे अमली पदार्थाची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरू आहे. यामुळे तरुण पिढी अमली पदार्थाची विळख्यात सापडली आहे, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
सिंधूदुर्ग जिल्ह्यात गेले काही महिन्यात दारूधंद्याला मोठ्या प्रमाणात उत आला आहे. या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित आहे. मागील गेल्या दोन ते तीन महिन्यांत कुटुंबातील दोन- दोन माणसांनी दारूच्या आहारी जाऊन आपले जीवन संपविले आहे. पिंगुळीमध्ये अशा प्रकारच्या दोन घटना अलीकडेच घडल्या आहेत. अलीकडेच पिंगुळी सराफदारवाडी येथे रेल्वे ट्रकवर दारू पित असताना अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाला होता. तसेच आठ दिवसापूर्वीच पिंगुळी येथे गोवा येथून दारूची वाहतूक करणारी कार कमानीवर आदळून अपघात झाला. अशाप्रकारे असे अवैध धंदा करणारे बेदरकार गाड्या चालवून जनतेच्या जीवितासही धोका निर्माण करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असून ही कार वाहतूक करणारी मुले १८ ते २० वयोगटातील होती. दारूमुळे आज अनेक कुटुंबांची वाताहात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसाल, देवगड, वैभववाडी येथील घटना पाहता दारूमुळे रक्ताच्या नात्याचाही विसर पडलेला आहे. देवगडमध्ये तर जन्मदात्या आईसह भावाचा दारुसाठी नशेत केलेला खून केला. मात्र, अशाप्रकारच्या घटना घडत असताना गोवा सरकारच्या तिजोरीत भर घालण्यासाठी हे अवैध दारूधंदे संबंधितांच्या जोरावर खुलेआम चालत आहेत.
एकूणच या वाढत्या दारू वाहतुकीवर संबधित यंत्रणेने ठोस पावले उचलली पाहिजेत. भविष्यात या दारूमुळे उद्धस्त होणारे अनेकांचे संसार वाचले पाहिजेत. त्यामुळे आपण योग्य कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले टाकावी अन्यथा शिवसेना दारू वाहतुकीविरोधात महिलांसमवेत रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस निरीक्षक कुडाळ यांना देण्यात आले.













