देसाई विद्या मंदिर व भा.वा. देसाई कनिष्ठ महाविद्यालय कुंभवडेे येथे कवी लोकनाथ् यशवंत यांचा विद्यार्थ्यांशी संवाद व मुलाखत

कविता जगण्यातील आनंद शोधून देते : कवी लोकनाथ यशवंत

राजापूर (प्रतिनिधी) : मराठीतील नामवंत कवी (नागपूर्) लोकनाथ यशवंत यांनी राजापूर तालुक्यातील, कुंभवडे येथील देसाई विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. कवी व शिक्षक मोहन कुंभार यांनी त्यांना प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या मनातील विविध समस्यांची उकल केली. कवी आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते.

कवी लोकनाथ यशवंत हे मराठीतील नामवंत कवी असून त्यांच्या कवितांचा समावेश शालेय अभ्यासक्रमापासून विद्यापीठय अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने त्यांच्या कविता खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. कवी लोकनाथ यशवंत यांची कविता अल्पाक्षरी कविता असून दीर्घाशयी आहे. आजच्या एकूणच मानव जातीच्या वेदनांकित जीवनातून त्यांची कविता आकार घेते. कवी लोकनाथ यशवंत म्हणतात, मी कवितामधून माणसाच्या वेदना हेरून त्याच्यावर नेमके बोट ठेवण्याचा प्रयत्न करतो. माणसाची वेदना नष्ट करण्यासाठी व माणसाच्या सुखासाठी माझी कविता आकार घेते. मी नेहमीच निरीक्षणातून समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठीच मी अनेक वृत्ती- प्रवृत्तींच्या माणसासमवेत राहतो. विविध स्तरावरच्या माणसां समवेत काम करतो. त्यामुळेच मला माणसे समजत जातात. घडणाऱ्या अनेक घटनांचा मी मनस्वी विचार करतो. या घडणाऱ्या घटना नेमक्या कशामुळे घडत असतात याविषयी मला प्रश्न पडतात. हे प्रश्नच मी कवितेतून मांडतो. ह्या समस्या म्हणजेच माणसाच्या जगण्याचे व्यंग आहे.हे व्यंग त्यांना दाखवून दिले की, कदाचित त्यांचा माणसाच्या जगण्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो या विचारांचा मी आहे. मला कविता शोधावी लागत नाही ती आपणच सापडत जाते. कविता मानवी परिवर्तन घडवून आणू शकते. याची अनेक उदाहरणं मी सांगू शकतो. संवेदनशील माणसाला जर कविता समजली तर त्यातून माणसाच्या जगण्याची उकल होऊ शकते. कविता हा कमी शब्दात आपलं म्हणणं व्यक्त करण्याचा प्रकार आहे. आणि हा मला खूप आवडतो. लहानपणापासूनच किमान शालेय जीवनापासून मला कविता लिहितो. वडिलांच्या नोकरीमुळे मला अनेक जिल्ह्यांमध्ये फिराव लागलं. यावेळी जुने मित्र सुटायचे. हे जुने मित्र हरवल्याची वेदना पोखरायची. माणसाच्या जीवनात आनंद शोधण्याचे कविता एक महत्त्वाचं साधन आहे. माणसाने मुक्त असावे. मुक्तपणे विचार करावे. मुक्तपणे जगावे. दुसऱ्यालाही मुक्तपणे जगू द्यावे, या विचारांचा मी आहे.

यावेळी मुख्याध्यापक व प्राचार्य नारायण कोल्हे यांनी आपले विचार व्यक्त केले. माणसाच्या जगण्यासाठी कविता किती महत्त्वाची आहे याविषयी प्राध्यापक नारायण राणे यांनीआपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी राजाभाऊ मुंडे यांनी कवी लोकनाथ यशवंत यांचे आभार व्यक्त केले. यावेळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.

कवी मोहन कुंभार यांनी लोकनाट यशवंत यांच्याशी मुलाखती द्वारे संवाद साधला.

error: Content is protected !!